जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ; ‘मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय’

खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याने राजीनामा देणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे

0

मुंबई,दि.14: राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ उडाली आहे. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय असं ट्विट करुन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खळबळ उडवून दिली आहे. पोलिसांनी आपल्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. तसंच लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, त्यामुळे राजीनामा देणार असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, की पोलिसांनी माझ्या विरुद्ध 72 तासात 2 खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे.. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. नंतर कोर्टाकडून आव्हाड यांची जामीनावर सुटका करण्यात आली. मात्र, यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केला.

काय आहे प्रकरण?

कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. याच कार्यक्रमात येताना गर्दीत आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करणारी महिला देखील होती. याच कार्यक्रमात विनयभंग झाल्याचा दावा संबंधित महिलेनं केला आहे. आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीनं शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा आरोप या 40 वर्षीय महिलेनं केला आहे. महिलेनं तातडीनं याची माहिती पोलिसांनी दिली. तर पोलिसांनी महिलेला याबाबत तक्रार दाखल करण्यास सांगितलं. त्यानुसार महिलेनं मुंब्रा पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.  


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here