राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एसटी बस चालवत शहरातून मारला फेरफटका

0

सांगली,दि.१५: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी इस्लामपूर बस आगारात एसटीचे सारथ्य करीत चालकाचा अनुभव घेतला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगारामध्ये जाऊन एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर थेट एसटीचे स्टेरिंग त्यांनी हातात घेतले. एसटी चालवत शहरातून फेरफटका देखील मारला. यावेळी, थेट बस चालवताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

एसटीच्या ड्रायव्हर सीटवर जयंत पाटील बसल्याचे व ते बस चालवत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. एसटी चालक म्हणून अनुभव घेत, एसटी चालकांच्या सोबत यावेळी त्यांनी संवाद साधला. तसेच, त्यांच्याकडून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. ड्रायव्हर सीटवर बसून जयंत पाटील यांनी एसटीचे वाहक म्हणून माहिती घेतली, तर चालक म्हणून एसटी चालवण्याचा अनुभवही घेतला. विशेष म्हणजे शहराच्या मुख्य रस्त्यावरून जयंत पाटलांनी एसटी चालवताना पाहून अनेकांनी त्यांना कॅमेऱ्यात कैद केले. 

दरम्यान, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना असलेला उत्साह आणि  त्यातच जयंत पाटलांनी पकडलेलं विठाई बसचं स्टेअरिंग यामुळे इस्लामपुरातील बस आगारात उत्साह द्विगुणीत पाहायला मिळाला. आगारातील एसटी गाड्याही आज दिमाखात सजल्या आहेत. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांना जोडणाऱ्या या लालपरीचे महाराष्ट्राच्या दळणवळणात मोलाचे आणि महत्त्वाचे योगदान असल्याचंही पाटील यांनी यावेळी म्हटलं. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here