संजय राऊत यांच्या महाविकास आघाडीबद्दलच्या वक्तव्यानंतर जयंत पाटील यांनी भूमिका केली स्पष्ट

0

मुंबई,दि.23: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या महाविकास आघाडीबद्दलच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. संजय राऊत यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीतील इतर पक्ष नाराज झाल्याची चर्चा होत असतानाच आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपली भूमिका जाहीर केली आहे. 

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्या तावडीतून कसे पलायन केले याचा घटनाक्रम सांगितला. तसेच, भाजपकडून शिवसेनेविरोधात कटकारस्थान आखले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर, पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी पलायन केलेल्या आमदारांनी इथे येऊन भेटावं, बोलावं, त्यांच्या मागणीची नक्कीच विचार केला जाईल. आता, त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडीसंदर्भात भाष्य केलं आहे. 

जयंत पाटील यांचे ट्विट

महाराष्ट्र विकास आघाडी हे महाराष्ट्राचा विकास आणि कल्याणासाठी स्थापन झालेले सरकार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवटपर्यंत ठामपणे उभे आहोत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा होईल, असे वर्तन कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही, असा मला विश्वास आहे, असे ट्विट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही महाविकास आघाडी सरकार गरज पडल्यास बहुमत सिद्ध करेल असे म्हटले. तसेच, संजय राऊत आणि इतर नेत्यांशी माझी चर्चा झाली. त्यांनी त्यांची बाजू मांडताना, त्या आमदारांना इथे येऊ तरी द्या, असे म्हटल्याचे खर्गे यांनी सांगितले.  


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here