जालना,दि.२९: Jalna Crime: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना शहरातील क्रीडा प्रबोधिनीतील एका क्रीडा शिक्षकाने चार विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात पोलिस आणि शिक्षण विभागाने चौकशी केल्यानंतर अखेर या क्रीडा शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.
जालना शहरातील या क्रीडा प्रबोधिनीमध्ये ग्रामीण भागातून आलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनी क्रीडा शिक्षण घेतात. याच ठिकाणी प्रमोद खरात हा क्रीडा शिक्षक आणि व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. त्याला क्रीडा शिक्षणाच्या नावाखाली येथील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना मिळाली होती.
बन्सल यांना सरद प्रकरणासंदर्भात आधीपासूनच शंका असल्याने सहायक पोलिस निरीक्षक आरती जाधव यांनी या पीडित मुलींची चौकशी केली. या चौकशीदरम्यान पीडित मुलींच्या भावनांचा बांध फुटला आणि त्यांनी सर्व घटनाक्रम सांगितला.
क्रीडा प्रबोधिनीमधील ज्या खोल्यांमध्ये सीसीटीव्ही नसायचा तिथेच क्रीडा शिक्षक आम्हाला वारंवार घेऊन जायचे. खोलीमध्ये गेल्यानंतर हा शिक्षक आमच्या छातीवरुन, पाठीवरुन आणि गळ्यावरुन हात फिरवायचा. आमच्यासोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न या शिक्षकाकडून व्हायचा, असा आरोप या पीडित मुलींनी केला आहे. यासंदर्भात विद्यार्थिनींनी आपल्या पातळीवर प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती.
सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी स्वतः पीडित मुलींची चौकशी केली. या सखोल चौकशीनंतर, गट शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून क्रीडा शिक्षक आणि प्रबोधिनी व्यवस्थापक प्रमोद खरात याच्या विरोधात विनयभंग आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी प्रमोद खरातला बेड्या ठोकल्या.