नवी दिल्ली,दि.१३: Jack Dorsey On Modi Govt: ट्विटरचे जॅक डॉर्सी (Jack Dorsey) यांनी मोदी सरकारबाबत मोठा दावा केला आहे. दोन वर्षापूर्वी केंद्र सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं होतं. या आंदोलनावेळी ट्विटरवर अनेक वापरकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात पोस्ट केल्या होत्या. आता या आंदोलनासंदर्भात ट्विटरचे माजी सह-संस्थापक जॅक डॉर्सी यांनी एका मुलाखतीत मोठा दावा केला आहे. ट्विटरला भारतातून अनेक विनंत्या मिळाल्या होत्या, ज्यात शेतकरी आंदोलन कव्हर करणारे खाते ब्लॉक करण्यास सांगितले होते. यासोबतच आंदोलनासाठी सरकारला विरोध करणारी खातीही बंद करण्याच्या मागण्या करण्यात आल्या होत्या, असा दावा डॉर्सी यांनी केला आहे. सध्या या मुलाखतीची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे.
या मुलाखतीमध्ये जॅक डॉर्सी यांना परदेशी सरकारच्या दबावा संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मोठा खुलासा केला.
Jack Dorsey On Modi Govt | काय म्हणाले जॅक डॉर्सी?
या प्रश्नाला उत्तर देताना जॅक डॉर्सी म्हणाले की, भारताचे उदाहरण घेता, तिथून अशा अनेक विनंत्या आल्या होत्या, यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सपोर्ट करणाऱ्यांची खाती ब्लॉक करण्याची विनंती केली होती.यात सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांच्या खात्यांचा उल्लेख करण्यात आला होता. यात असंही म्हटले होते की, ट्विटरने असे केले नाही तर भारतात ट्विटर बंद होईल आणि भारतातील ट्विटर कर्मचाऱ्यांच्या घरांवर छापे टाकले जातील. तसेच भारत हा लोकशाही देश असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
जॅक डॉर्सी यांनी भारताची तुलना तुर्कस्तानशी केली आणि तुर्कस्तानमध्येही अशीच समस्या भेडसावत असल्याचे सांगितले. ‘तुर्की सरकारने देखील तुर्कीमध्ये ट्विटर बंद करण्याची धमकी दिली होती, अनेकदा सरकारशी न्यायालयीन लढाई सुरू होती, ती लढाई आम्ही जिंकली.
२०२१ मध्ये भारत सरकारने तीन कृषी कायदे आणले होते, ते विरोधानंतर मागे घेण्यात आले होते. नोव्हेंबर २०२० च्या आसपास सुरू झालेल्या दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकऱ्यांनी या विधेयकाविरोधात निदर्शने केली होती.