नवी दिल्ली,दि.२५: संजय राऊतांच्या सोशल मिडियावरील पोस्टचा इस्रायलकडून निषेध करण्यात आला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात चालू असलेल्या युद्धाबाबत संजय राऊतांनी केलेल्या एक्स पोस्टवरून इस्रायलने शुक्रवारी संताप व्यक्त केला. इस्रायली दुतावासाने यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालय आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी संजय राऊतांच्या एक्स पोस्टबाबत कडक शब्दांत टीका केली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, १४ नोव्हेंबर रोजी संजय राऊत यांनी इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे गाझातील परिस्थिती विषद करणारी एक बातमी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केली होती. या पोस्टवर कमेंट करताना त्यांनी “हिटलर ज्यूंचा इतका तिरस्कार का करत होते, हे आता समजतंय का?” असं म्हटलं होतं. त्यांच्या या एक्स पोस्टवरून प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे त्यांना ही पोस्ट तत्काळ डिलिट करावी लागली. परंतु, ही पोस्ट इस्रायलच्या दुतावासांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली असून त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे.
कोणती बातमी पोस्ट केली होती?
इस्रायलने गाझातील अल शिफा रुग्णालयाला लक्ष्य केलं आहे. या रुग्णालयात हमास या दहशतवादी संघटनेचे दहशतावादी लपले असून इस्रायलच्या ओलिसांनाही तिथंच डांबून ठेवल्याचा इस्रायलचा दावा आहे. त्यामुळे इस्रायलने या रुग्णालयाभोवती वेढा घातला आहे. यामुळे या रुग्णालयातील महिला आणि नवजात बालकांची गैरसोय होत असल्याबाबतची बातमी संजय राऊतांनी एक्सवर पोस्ट केली होती, असं इंडिया टुडेने वृत्तात म्हटलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
“एक जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने भारत सरकारची इस्रायल गाझा संघर्षाच्या संदर्भात जी भूमिका आहे तीच माझी भूमिका असून मी मांडत आलो आहे. मात्र इस्रायलकडून या संघर्षात गाझा पट्टीतील लहान मुलांची हत्या झाली तेव्हा मी इस्रायलवर टीका केली आहे. हे वगळता इस्रायल प्रकरणी माझी भूमिका वेगळी नाही”, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.