भाजप देशद्रोह्यांना पाठिंबा देणारा पक्ष आहे का: विजय वडेट्टीवार

0

मुंबई,दि.5: भाजपा देशद्रोह्यांना पाठिंबा देणारा पक्ष आहे का? असा प्रश्न काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. भाजपाने उज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून निकम निवडणूक लढवत आहेत. उज्ज्वल निकम हे 26/11 प्रकरणासह अनेक मोठ्या खटल्यांमध्ये वकील होते.

उज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसने 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा उकरुन काढला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी दावा केला की, 26/11 हल्ल्यात शहीद झालेले IPS अधिकारी हेमंत करकरे यांच्यावर कोणत्याही दहशतवाद्याने नाही, तर आरएसएस समर्थित पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या घाडल्या आणि ही गोष्ट देशद्रोही उज्ज्वल निकम यांनी लपवून ठेवली.

देशद्रोही व्यक्तीला तिकीट देणारा भाजप देशद्रोह्यांना पाठिंबा देणारा पक्ष आहे का, असा प्रश्नही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. उज्ज्वल निकम दहशतवादावर ठाम भूमिका घेतात आणि त्यांच्या स्पष्ट मतांसाठी ओळखले जातात. तसंच, ते अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. कसाबला फाशी देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

यंदाच्या लोकसभा निवडुकीत भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याऐवजी उत्तर मध्य मुंबईतून निवृत्त सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. निकम हे तेच सरकारी वकील आहेत, ज्यांच्यामुळे दहशतवादी कसाबला फाशीची शिक्षा झाली. निकम यांच्या विरोधात काँग्रेसने आमदार वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. आता इतक्या वर्षांनंतर निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस निकम यांच्यावर गंभीर आरोप करत आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here