Irshalgad Landslide: रायगडातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली, 4 जणांचा मृत्यू

0

रायगड,दि.20: Irshalgad Landslide: गेल्या 24 तासांपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे इर्शाळवाडी (Irshalgad) इथं दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. महाराष्ट्राची आजची पहाट अत्यंत दुखद बातमीनं झालीये. इर्शाळवाडी येथे 250 लोकांची वस्ती असून त्यातील 100 लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. रात्रीपासून दुर्घटनास्थळी शोधमोहिम सुरू आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. (Irshalgad Landslide)

इर्शाळवाडी इथं दरड कोसळली | Irshalgad Landslide

या दुर्घटनेबाबत पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, रात्री 11 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. रात्रीपासून पालकमंत्री या नात्याने मी स्वत: आणि प्रशासन घटनास्थळी आहोत. आतापर्यंत 26 लोकांना रेस्क्यू केले आहे. त्यातील 4 मृत आहेत. जखमींना नवी मुंबईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. काळोख असल्याने काही वेळ रेस्क्यू थांबले होते. आता पुन्हा पहाटेपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत इर्शाळगडाजवळ ही आदिवासी लोकांची वस्ती होती. तेथील 40-50 घरांवर ही दरड कोसळली आहे. सध्या घटनास्थळी शोधकार्य सुरू आहे. इर्शाळगडावर पायथ्याशी, मध्याशी आणि उंचावर अशा तीन वस्त्या आहेत. सर्वात उंचावर असलेल्या वस्तीवर ही दरड कोसळली आहे. पाऊस सुरू असल्याने बचाव कार्यात अडथळा येत आहे. याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे घटनास्थळी पोहचले आहेत तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पोहचणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे ऑनफिल्ड असून उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात पोहचले. त्याठिकाणाहून अजित पवारांनी या दुर्घटनेचा आढावा घेतला.

काय घडलं रात्री?

रात्री पाऊस पडत होता, आम्ही सगळे घरात झोपलो होतो. तितक्यात मोठा आवाज झाला, त्यामुळे आम्ही घाबरलो, तातडीनं मुलाबाळांना घेऊन घरातून बाहेर पडलो. बाहेर आलो तेव्हा अनेक घर दरडीखाली गेल्याचे दिसून आले. मोठी झाडे पडली होती. आमचे घर खचले आम्ही तिथून खाली आलो असं या दुर्घटनेत वाचलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here