विमा कंपन्यांनी केली शेतकऱ्यांची थट्टा, केले जखमेवर मीठ चोळण्याचे काम

0

बुलडाणा,दि.१३:जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा संकटात सापडला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आधिच शेतकरी गेल्या तीन चार वर्षांपासून विविध संकटांना तोंड देत आर्थिक संकटात सापडलाय आणि दुसरीकडे विमा कंपन्या देखील शेतकऱ्यांची थट्टा करतांना दिसत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यात एकरी दोनशे रुपये ते पाचशे रुपयांपर्यंत विमा जमा करण्यात आला आहे.

उशिराने का होईना मागील दोन दिवसांपासून विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. मात्र, शेतकऱ्यांचे सोयाबीनचे नुकसान एकरी चार ते पाच किलोचे झाल्याचे दाखवण्यात आले आणि त्यानुसार पैसे खात्यात जमा केले जात आहेत त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. अश्याच संतप्त शेतकऱ्यांनी शेगाव येथील तालुका कृषी कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. दोन दिवसात उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अन्यथा कृषी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात मागीलवर्षी सततच्या पावसामुळे सोयाबीन, तुर, उडीद, कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी पिकविम्यात सर्वाधिक सोयाबीनचा पिकविमा काढला होता, त्यासाठी हेक्टरी ९०० रुपयांची रक्कम शेतकऱ्यांनी पिकविमा कंपनीकडे भरणा केली होती तर २०० रुपये ऑनलाईन विमा भरण्यासाठी लागले होते.

दरम्यान, शंभर टक्के नुकसान झाल्यामुळे पिकविमा कंपनीने किमान हेक्टरी ४० ते ४३ हजार रुपये नुकसान भरपाई देणे अपेक्षित असतांना भरलेल्या प्रीमियमपेक्षाही कमी म्हणजेच २०० ते ५०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून एक प्रकारे जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here