सोलापूर,दि.20: उद्योगपती मुकेश अंबानी यांनी राम मंदिर कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. अयोध्येत 22 जानेवारीला राम मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. जगभरातील अनेक देशात या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भारतातही अनेक राज्यात या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
या सोहळ्यानिमित्त रामनगरी अयोध्या सजवण्यात आली आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. तो ऐतिहासिक क्षण देशवासीय याची देही याची डोळा पाहण्यासाठी उत्सुक आहे. देशात सोमवार 22 जानेवारीचा दिवस दिवाळीसारखा असणार आहे.
या ऐतिहासिक क्षणाच्या पार्श्वभूमीवर उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त सुट्टी जाहीर केली आहे.
राम मंदिर कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा, आसाम आणि ओडिशा या राज्यांमध्ये सार्वजनिक सुटी आधीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही हाच निर्णय घेतला आहे.