Indurikar Maharaj: निवृत्ती महाराज इंदुरीकरांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य

0

अकोला,दि.८: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) हे अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करतात. २०२० साली एका किर्तनामध्ये त्यांनी सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते. असं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांचं हे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. या प्रकरणात त्यांना नोटीसही पाठवण्यात आलेली. आता परत एकदा इंदुरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) हे पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. निवृत्ती महाराज इंदुरीकरांनी त्यांच्या किर्तनातून पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावेळेस इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर टीका केलीय. मात्र ही टीका करताना त्यांचा तोल ढळल्याचं दिसून आलं आहे.

अकोला येथील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी सोमवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये इंदुरीकर महाजारांच्या किर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला. यावेळेस इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर सडकून टीका केली. इंदुरीकर महाराजांनी या किर्तनादरम्यान अनेकदा युट्यूबर्सचा उल्लेख करत माझ्या किर्तनाचे व्हिडीओ पोस्ट करुन हे लोक कोट्याधीश झाले असा टोला लगावला. “चार हजार युट्यूबवाले कोट्याधीश झाले. माझ्याच किर्तनाच्या क्लिप बनवून मलाच कोर्टात खेचलं. यांचं वाटोळच होणार. यांचं चांगलं होणार नाही,” असं इंदुरीकर महाराज म्हणाले.

इतकच नाही तर त्यांनी पुढे युट्यूबर्सवर टीका करताना यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील असंही वक्तव्य केल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. या किर्तनादरम्यान त्यांचे व्हिडीओ काढणाऱ्यांना त्यांनी अनेकदा हटकलं. व्हिडीओ काढू नका असं त्यांनी अनेकदा सांगितलं. संपूर्ण किर्तनामध्ये त्यांचा युट्यूबवर्सवरील संताप दिसून आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here