‘भारतीय राष्ट्रवाद ही एक विचारधारा’ असदुद्दीन ओवेसी

0

मुंबई,दि.4: एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष AIMIM मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जागांवर उमेदवार उभे करू शकतो. ओवेसी यांनी लोकसभा निवडणुकीशी संबंधित विविध मुद्द्यांवर एबीपी माझाशी खास बातचीत केली, ज्यामध्ये ते म्हणाले की, राजकीय पक्ष मुस्लिमांची मते घेऊ इच्छितात परंतु त्यांना तिकीट देऊ इच्छित नाही. भाजपची ‘बी’ टीम बोलल्याबद्दल ओवेसींनी काँग्रेसवर जोरदार प्रहार करत आमचा पक्ष अमेठीला निवडणूक लढवण्यासाठी गेला नव्हता, मग तुमचे उमेदवार तिथून निवडणूक का हरले? असा सवाल त्यांनी विचारला.

सध्याची परिस्थिती वेगळी आहे. नरेंद्र मोदीजी म्हणतात की सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास. पण खरे पाहता त्यांनी भारतीय राजकारणातून मुस्लीम घटकाला बाजूला करण्याची सुरुवात केलीय, पंतप्रधान मोदी यांची विचारधारा हिंदू राष्ट्रवादाची आहे. त्यांच्यासमोर जर टिकून राहायचे असेल तर भारतीय राष्ट्रवादाचा मुद्दा घेऊन आम्ही जनतेत जाऊ. आपल्या स्वातंत्र्यसेनानींनी देशाला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून सोडवले कारण त्यांना अपेक्षा होती की हा देश ‘भारतीय राष्ट्रवादा’च्या मुद्द्यावर आगेकूच करत राहील. असे असदुद्दीन ओवेसी एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.

ओवेसी म्हणाले, तुमचे काम फक्त भाजपला हरवणे आहे. मी पण म्हणतो की भाजपचा पराभव करा, पण मुस्लिमांना धर्मनिरपेक्षतेचे कुली म्हणून ठेवता येणार नाही. तुम्ही आरक्षणाबद्दल बोलता. मराठ्यांना द्या पण मुस्लिमांनाही द्या. सर्वांना वाटा मिळाला पाहिजे. त्याचा फायदा जातीयवादी शक्तीला होईल असे तुम्ही मुस्लिमांबद्दल बोलणार नाही.

“मोदीजी अशा लोकांची साथ देत आहेत जे व्यावसायिकदृष्ट्या त्यांच्या फायद्याचे आहेत. मोदीजी म्हणतात की ते एका विशिष्ट समाजातून पुढे आले आहेत आणि त्यांनी चहा विकला आहे. जी गोष्ट खरी आहे यात वादच नाही पण ते आता ज्याप्रकारे देश चालवत आहेत ते पाहता ही विचारधारेची लढाई ठरणार आहे,” असे ते एबीपीमाझाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

भारतीय राष्ट्रवाद ही एक विचारधारा

“मुस्लीम मुद्द्यांवर मोदींना प्रश्न विचारला की ते सबका साथ सबका विकास म्हणतात पण खरे पाहता तसे काहीच घडत नाही. भारतीय राष्ट्रवाद ही एक विचारधारा आहे. या विचारधारेमध्ये सर्व घटकांचा समावेश केला जातो. यातून कोणालाही वगळले जाऊ शकत नाही. आम्ही सर्व प्रकारच्या विषयांवर बोलतो. पण पंतप्रधान मोदी यांची सध्याची रणनीति पाहता ते हिंदू राष्ट्रवादावर लक्ष केंद्रित करत आहेत,” असेही ओवेसी यांनी स्पष्ट केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here