दि.26: पाकिस्तान टीमने टीम इंडियाचा टी-20 वर्ल्ड कपमध्ये दारूण पराभव केला. यानंतर भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीवर (Mohammad Shami) सोशल मीडियाच्या माध्यमातून गलिच्छ टीका करण्यात आली. मोहम्मद शमीने मॅच फिक्सिंग केल्याचे आरोप काही ट्रोलर्सनी केले, तसंच त्याचा धर्मही काढण्यात आला. हा वाद वाढल्यानंतर भारताच्या अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी मोहम्मद शमीला पाठिंबा दर्शवला. बीसीसीआयने (BCCI) मात्र या प्रकरणाच्या 40 तासांनंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रविवारी झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 151 रन केले. विराट कोहलीच्या अर्धशतकाशिवाय इतर खेळाडू अपयशी ठरले. पाकिस्तानने 17.5 ओव्हरमध्येच हे आव्हान पार केलं. मोहम्मद शमीने या सामन्यात 3.5 ओव्हरमध्ये 43 रन दिले.
मोहम्मद शमीनं पाकिस्तानच्या इनिंगमध्ये 18 व्या ओव्हरमध्ये बॉलिंग केली. तो बॉलिंगला आला तेव्हा पाकिस्तानला विजयासाठी 17 रनची आवश्यकता होती. पाकिस्ताननं 5 बॉलमध्येच हे रन पूर्ण करत टीम इंडियाला पराभूत केलं. त्यानंतर काही फॅन्सनी शमीवर टीका करत त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला.
बीसीसीआयने मोहम्मद शमीचा एक फोटो ट्वीट केला आहे. अभिमान, मजबूत, वर आणि पुढे’ असं कॅप्शन बीसीसीआयने या फोटोला दिलं आहे. मोहम्मद शमीवर करण्यात आलेल्या या धार्मिक हल्ल्यानंतर सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण या दिग्गजांनी थेट आणि स्पष्ट भूमिका घेतली घेत या ट्रोलर्सवर टीका केली.