मराठा समाजाच्या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्ते आपसातच भिडले, जोरदार हाणामारी

0

छत्रपती संभाजीनगर,दि.29: मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार हाणामारी झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. लोकसभा उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक सुरू होती. या बैठकीत कोणीही उमेदवारीसाठी आपल्याकडून नावं सुचवू नयेत असा प्रोटोकॉल ठेवण्यात आला होता.

पण यावेळी अनेकजण नावांचे प्रस्ताव मांडू लागल्यानंतर हा राडा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समजाला गावागावात बैठका घेऊन, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्याचं आवाहन केलं होतं. याच पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. 

मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार उमेदवार ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. 60 ते 70 समाज बांधव बैठकीला उपस्थित होते. सुरुवातीला बैठक शांततेच्या मार्गाने सुरू होती, मात्र अचानक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काही कार्यकर्त्यांनी विशिष्ट उमेदवाराकडून पैसे घेऊन बैठक आयोजित केल्याचा आरोप केला.

आरोपानंतर विकी पाटील या तरुणाला बेदम मारहाण करायला सुरुवात झाली. बाळू औताडे या तरुणाकडून सुरुवातीला मारहाण झाली. त्यानंतर इतरही तरुणांनी मारहाण केली. मारहणीनंतर बैठक उधळली गेली आणि पुढे बराच वेळ राडा सुरू होता. राडा झाल्यामुळे उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे. या राड्यानंतर महाराष्ट्रातून उमेदवार उभे करण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here