शिवसेनेला मोठं खिंडार, ठाण्यात शिवसेनेचे 66 नगरसेवक शिंदे गटात सहभागी

0

ठाणे,दि.7: राज्यात मागील जवळपास दोन आठवड्यांपासून राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठे खिंडार पाडले. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे 40 आमदार गेले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीही झाले. शिंदे गट आणि भाजपने बहुमत सिद्ध करून राज्यात सरकार स्थापन केलं. मात्र, राज्यातील या सत्तातरानंतर उद्धव ठाकरे यांना आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाण्यात शिवसेनेला आता मोठं खिंडार पडलेलं आहे.

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेणारे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे. ठाणे महानगरपालिकेतील 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. बुधवारी रात्री या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे जिल्ह्यावर मजबूत पकड आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याची सूत्रे आली होती. ठाणे महापालिकेत मागील काही दशकांपासून शिवसेनेची सत्ता आहे. आता आगामी महापालिका निवडणुकीआधीच ठाण्यातील 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याने शिवसेनेपुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेला पु्न्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, याआधी ठाण्याचे महापौर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता नगरसेवकही शिंदे गटाकडे वळल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे.

ठाणे महापालिकेत शिवसेनेचे 67 नगरसेवक असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे 34, भाजपकडे 23, काँग्रेसकडे 3 आणि एमआयएमकडे 2 नगरसेवक आहेत. ठाणे महापालिकेचा कार्यकाळ संपला असून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यात ठाणे महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

66 नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. माजी महापौर नरेश मस्केंसमवेत 66 नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी आपलं समर्थन शिंदे गटाला दिलं. शिवसेनेचा एकही नगरसेवक आता ठाणे महानगरपालिकेत राहिलेला दिसत नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here