महाविकास आघाडीच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजपा करणार माफी मांगो आंदोलन

0

मुंबई,दि.१६: महाविकास आघाडीच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजपा माफी मांगो आंदोलन करणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेली अवमानकारक वक्तव्ये, महाराष्ट्रातून अन्य राज्यात पळविले जाणारे प्रकल्प यांसह अनेक मुद्दय़ांवर मुंबईत महाविकास आघाडीतर्फे १७ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या या मोर्चाला उत्तर देण्यासाठी आता भाजपानेही कंबर कसली आहे. भाजपाही उद्या मुंबईत ‘माफी मांगो’ आंदोलन करणार आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. दरम्यान यावेळी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला म्हणणाऱ्या संजय राऊतांनाही लक्ष्य केलं.

संजय राऊत यांना पाठवली पुस्तके

संजय राऊत यांना भाई गिरकर यांनी आंबेडकरांसंबंधी दोन पुस्तकं पाठवली असल्याची माहिती देत त्यांनी कुरिअरची पावतीही दाखवली. “बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारित दोन पुस्तकं संजय राऊत यांना पाठवली आहे. त्यांनी याचा अभ्यास करावा,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

जन्मस्थळाचा वाद निर्माण करत अफगाणी संकट आणलं

“बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला यावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या वतीने सुरु आहे. तो जाणीवपूर्वक सुरु असून, त्यामागील कारणं अस्पष्ट आहेत. एखादं संकट आल्यावर शेतकऱ्याला ते अस्मानी आहे की सुलतानी असा प्रश्न पडतो. तसा आंबेडकरप्रेमी, समस्त भारतीय नागरिकांवर आंबेडकरांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करत अफगाणी संकट आणलं आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

“तालिबानच्या भागात गौतम बुद्धांच्या प्रतिमांवर हल्ला झाल्याचं आम्ही पाहिलं होतं. आता शांततापूर्ण आणि शांततेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचे अनुयायी असणारा समाज आणि त्यातही आमचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थानाचा वाद निर्माण केला जात आहे. हे का केलं जात आहे हा आमचा प्रश्न आहे,” असं शेलार म्हणाले.

“आपलं अज्ञान पाजळण्याची एकही संधी संजय राऊतांनी सोडलेली नाही. डॉक्टर चांगली औषधं देतो की कंपाऊंडर या वादात मला पडायचं नाही”, असा टोलाही त्यांनी लगावला. यांची मस्ती आंबेडकरांच्या जन्मस्थळापर्यंत गेली आहे. ही खोटी माहिती पसरवणं अक्षम्य चूक आहे असंही त्यांनी म्हटलं.

“संजय राऊत उद्या स्वातंत्र्य, संविधान आणि बंधुताही उद्धव ठाकरेंमुळे मिळाली आहे असं तर छापणार नाही ना? काय सुरु आहे?,” अशी संतप्त विचारणा यावेळी त्यांनी केली. “नव्याने इतिहास लिहिण्याचा प्रयत्न सुरु असून भाजपाला हे मान्य नाही. भाजपा याचा निषेध करत असून उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

हा महाराष्ट्रद्रोह नाही का?

आशिष शेलार यांनी यावेळी सुषमा अंधारेंनाही लक्ष्य केलं. “प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण यांचा अपमान, संत ज्ञानेश्वरांची खिल्ली, संत एकनाथ यांची चेष्टा, वारकरी संप्रदायाचा अपमान हा महाराष्ट्रद्रोह नाही का?,” अशी विचारणा त्यांनी उद्धव ठाकरेंना केली.

“हिंदू देव-देवतांचा अपमान करणं, हिंदू मानाला इजा पोहोचवणारी वक्तव्यं समोर आल्यानंतर उद्धव ठाकरे तुम्ही मौन सोडायला तयार नाही. उद्या कसले डोंबलाचे मोर्चे काढत आहात,” अशी टीका यावेळी त्यांनी केली. उद्या मुंबईभर भाजपा ‘माफी मांगो’ निदर्शन करणार आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. मुंबईभर सहाही लोकसभा क्षेत्रात आक्रमक आंदोलन केलं जाईल असं ते म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here