Omicron Variant: महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 28 संशयित रुग्ण आढळले

0

Omicron Variant: कोविडच्या (Covid – 19) ओमिक्रॉन (Omicron) या नवीन प्रकाराची प्रकरणे भारतात समोर आली आहेत. कर्नाटक (Karnataka) राज्यात या प्रकाराचे 2 बाधित आढळले आहेत. गुरुवारी, (दि.2) आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, देशात कोविडच्या ओमिक्रॉनच्या प्रकरणाची पुष्टी झाल्याने चिंता वाढली आहे. त्यात महाराष्ट्रात एकूण 28 ओमिक्रॉन संशयित रुग्ण सापडल्यानं ही डोकेदुखी आणखीनच वाढली आहे. त्यातील 10 संशयित हे एकट्या मुंबईतील आहेत.

30 देशांमध्ये ओमिक्रॉनचे (Omicron) रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संसर्गक्षमता जास्त असल्याचं दिसतंय, पण कोणीही गंभीर आजारी झालेलं नाही. कोव्हिड अनुषंगिक वर्तन आपण अंगी बाळगावे, कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या दोन्ही लशी उपयुक्त आहेत, अँटिबॉडीजना हा कोरोना व्हेरिअंट भेदू शकत नाही, हे तज्ज्ञांचं मत आहे, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, कारण ओमिक्रॉनची लक्षणं सामान्य आहेत, असं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून शेकडो जण परदेशातून आले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत असून, त्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ओमिक्रॉनचे 28 संशयित सापडले आहेत. त्यातील 10 जण हे मुंबईतील आहेत. तर इतर उर्वरित शहरांतील आहेत. या 28 जणांपैकी 25 जण हे विदेशातून आलेले आहेत. तर इतर 3 जण हे त्यांच्या संपर्कातील असल्याची माहिती समजते.

राज्यात ओमिक्रॉनचे 28 संशयित रुग्ण सापडले असून, त्यातील 10 जण हे मुंबईतील आहेत. या सर्वांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे किंवा नाही हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. पुढील आठवड्यात या चाचण्यांचे अहवाल येण्याची शक्यता आहे. मुंबईत अद्याप एकही ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला रुग्ण सापडलेला नाही, असे मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. ज्या संशयितांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत, त्यांचे अहवाल लवकरच येतील अशी शक्यताही व्यक्त केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here