इतिहासात जिंकले तर पेशवे आणि हारले तर मराठा हा जातीय मतभेद कोणी निर्माण केला: जितेंद्र आव्हाड

0

मुंबई,दि.१३: राष्ट्रवादीचे नेते मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरेंनी काल (दि.१२) ठाण्यात जाहीर सभा घेतली. यावेळी राज ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मशिदींवरील लाऊड स्पीकरवरूनही राज ठाकरेंनी टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर राज्यात जातीयवाद बोकाळला, या वक्तव्याचा राज यांनी पुनरुच्चार केला. यावेळी त्यांना पवार कुटुंबावर गंभीर आरोप केले. दरम्यान त्यांनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे. ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज ठाकरेंना अनेक प्रश्न विचारले.

“कालच्या भाषणात बाबासाहेबांचा उल्लेखच नाही. तुम्ही जय भीमदेखील म्हणाला नाहीत. तुम्हाला अचानक काय झालं? शरद पवारांनी जातीयवाद वाढवला असं सांगता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला कोणी विरोध केला हे तुम्हाला माहिती नाही का? आईला सती न जाऊ देता शिवाजी महाराजांनी सगळं कर्मकांड तोडलं हे तुम्हाला माहिती नाही का? दुर्दैवाने तुम्ही पुरंदरेच वाचता. अफजलखानाचा कोथळा काढला त्याबद्दल प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे. पण त्याचसोबत अफजलखान खाली पडल्यानतंर महाराजांच्या आयुष्यात त्यांच्यावर एकदाच वार झाला. उजव्या खांद्यावर झालेला वार कोणी केला होता? अफजलखानाचा वकील कोण होता हे लपवून का ठेवता? अफजलखानाची सैनिक म्हणून जिजामातेंच्या आदेशाप्रमाणे कबर बांधली होती. पण ज्या माणसाने हल्ला केला होता त्याचं मुंडकं तलवारीवर घेत अख्ख्या गावभर फिरवलं त्याचं नाव तुम्ही का नाही सांगत? त्याचं नाव होता कृष्णा भास्कर कुलकर्णी…हे महाराष्ट्राला काही नाही सांगत? कोण जातीयवाद वाढवतंय?,” अशी विचारणा जितेंद्र आव्हाड यांनी केली.

“त्यानंतरच्या इतिहासात जिंकले तर पेशवे आणि हारले तर मराठा हा जातीय मतभेद कोणी निर्माण केला. पेशवे नव्हते असं तुम्ही कसं सांगू शकता. चित्रपट निघतात ते कोणावर निघतात. हे सगळं तुम्ही कधी सांगणार? ते उभं राहून हिडीस तिडीस बोलणं, टिंगळटवाळ्या करणं…तुम्हाला पेट्रोलचे, डिझेलचे, गॅसचे, भाजीपाल्याचे भाव दिसत नाहीत. त्यावर काहीच बोलणार नाही. एवढं भोंग्याबद्दल प्रेम आहे तर कालची सभा तुम्ही का घेतली? जिथे सभा घेतली तिथे एका बाजूला शाळा आणि शिवसमर्थ विद्यालय आहे. सुप्रीम कोर्टाचा नियम १०० मीटरच्या आजुबाजूला कर्णे लावू नये सांगितलं आहे. मग तुमच्या कार्यकर्त्यांना माहिती नाही का?,” असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला.

“तुम्ही म्हणालात की दाढीच करत नाहीत तर वस्तरा कसा सापडेल…मुसलमान दाढीच करत नाही. तुमचा एक हाजी अराफत शेख नावाच मित्र होता हे विसरलात का..जो सध्या भाजपात आहे. तो मनसेच्या वाहतूक सेनेचा अध्यक्ष होता. त्याच्या बाजूला बसून तुम्ही अनेकवेळा जेवला होतात. तो दाढीच करायचा नाही हे विसरलात का?,” अशी विचारणा आव्हाडांनी केली.

“मी २००९ ला मुंब्र्यात गेलो, तेव्हापासूनचा इतिहास चाचपडून पाहा. फक्त दोनदा तेही बाहेरुन आलेले लोक ही अतिरेक्यांच्या रेकॉर्डवर आहेत. तेव्हा राज ठाकरेंनी बोलताना इतिहास जाणून घ्या. तुमच्यासमोर एक मुस्लिम बसला होता त्याचं उदाहरण दिलंत, त्याला दाढी नव्हती का? म्हणजे तुम्ही आता मुस्लिमांना प्रमाणपत्र देणार की देशद्रोही आहेत की देशप्रेमी…हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?,” असं आव्हाड म्हणाले.

“तुम्ही इतरांच्या नाकावर, चेहऱ्यावर, रंगावर जाता…म्हणजे तुमच्यात वर्णभेद, जातीवाद किती ठासून भरला आहे ते दिसत आहे. आम्ही आता जर तुम्ही ढोरपुटे झालात, तोंड कसं सुजलंय म्हटलं तर आवडेल तुम्हाला? राजकारणात वैयक्तिक टीका करणं पाप आहे. तुम्ही माझी अक्कल काढलीत..तुम्हा फार हुशार आहात. तुमच्या आजोबांनी प्रतापसिंह राजेवर यांच्यावर लिहिलेलं पुस्तक वाचा,” असा सल्ला जितेंद्र आव्हाडांनी दिला.

तुम्हाला नेहमी फूट पाडण्याची सवय आहे असा आरोप यावेळी त्यांनी केला. शिव्या आम्हीदेखील घालू शकतो फक्त ते आमच्या संस्कारात बसत नाही असंही ते म्हणाले. तुमचं भाषण तुम्हाला लखलाभ असो पण संत तुकाराम महाराजांनी उत्तर जशास तसं द्यायला हवं असं सांगितलं आहे. तुमच्या भाषणावरचे ट्रोल जरा पहा. कौतुकापेक्षा हसत आहेत. तुम्हाला आत लोक जॉनी लिव्हर म्हणत आहेत याची लाज वाटते असं आव्हाड म्हणाले.

“पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील शरद पवारांचा फोटो समोर आला ना? उद्धव ठाकरेंच्या घरी गणपतीच्या पाया पडतानाचा फोटो समोर आला ना? तुम्ही म्हणजे इतिहासतज्ञ नाही. तुम्हाला अक्कल आहे असं नाही,” अशी टीका आव्हाडांनी केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here