भाजपमध्ये मी मस्त, निवांत आहे शांत झोप लागते, आपल्यामागे चौकशी नाही : हर्षवर्धन पाटील

0

पुणे,दि.१३:महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून सत्ताधारी मंत्री व नेत्यांच्या मागे ईडी, सीबीआय व इन्कम टॅक्स अशा केंद्रीय चौकशी यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. रोजच्या रोज छाप्यांच्या व समन्सच्या बातम्या येत आहेत. बहुतेक सर्व कारवाया केवळ महाविकास आघाडीशी संबंधित नेत्यांवर होत आहेत. भाजपशी संबंधित कोणालाही समन्स धाडलं गेल्याचं किंवा त्यांची चौकशी झाल्याचं गेल्या दीड वर्षांत क्वचितच पाहायला मिळालं आहे. सत्ताधारी आघाडीतील तिन्ही पक्ष सातत्यानं हा आरोप करत आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळं महाविकास आघाडीतील नेत्यांच्या आरोपांना एकप्रकारे बळकटी मिळाली आहे.

‘भाजपमध्ये मी मस्त, निवांत आहे. शांत झोप लागते. आपल्यामागे चौकशी नाही, काही नाही…’ हे वक्तव्य आहे सध्या भारतीय जनता पक्षामध्ये असलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं. मावळमधील एका कार्यक्रमात त्यांनी गंमतीनं हे वक्तव्य केलेलं असलं तरी त्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीआधी अनेक नेत्यांना पक्षांतर करावं लागलं होतं. हर्षवर्धन पाटील काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले तर, मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये गेले. कार्यक्रम सुरू असताना व्यासपीठावर बसलेल्या एका नेत्यांना त्यांंना खासगीत याबाबत विचारलं. आपल्या भाषणात त्यांनी हा किस्सा जाहीरपणे सांगितला. ‘आम्हालाही भाजपमध्ये जावं लागलं. तो निर्णय मी का घेतला तेवढं मला विचारू नका. ते काँग्रेसच्या नेत्यांना विचारा, असं ते म्हणाले. ‘पण आता भाजपमध्ये मी निवांत आहे. शांत झोप लागते. चौकशी नाही, फिवकशी नाही, काही नाही,’ अशी मिश्किल टिप्पणी पाटील यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये जोरदार हंशा पिकला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here