औरंगाबाद,दि.३: एमआयएमचे इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर (Raj Thackeray) गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी आज रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांसोबत नमाज अदा केली. नमाज अदा केल्यानंतर जलील यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेवर भाष्य केलं. देशात बंधू-भाव आणि शांतता नांदावी अशीच दुआ मी मागितली. राज ठाकरे यांना मी आमच्या इस्लाम धर्मानुसार बंधू-भावाच्या उद्देशानं इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलं होतं. पण ते त्यांनी स्वीकारलं नाही. त्यानंतर औरंगाबादच्या सभेत त्यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली त्यानंतर ते आता बोलावण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत, असं इम्तियाज जलील म्हणाले.
राज ठाकरेंना इफ्तारीसाठी बोलावलं होतं. आता त्यांना ईदचा शिरखुरमा खाण्यासाठी बोलावणार का? असं जलील यांना विचारण्यात आलं असता त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. “राज ठाकरेंनी औरंगाबादच्या सभेत ज्या पद्धतीची भाषा वापरली ती पाहता आता ते शिरखुरमाचं निमंत्रण देण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत. त्यांना मी दुरूनच ईद मुबारक देतो”, असं इम्तियाज जलील म्हणाले.
गुन्हा दाखल झाला नाहीतर
राज ठाकरेंविरोधात कारवाईबाबत बोलताना इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारवरही ताशेरे ओढले. “राज ठाकरेंवर अजूनही एफआयआर दाखल का होत नाही हा प्रश्न मला पडला आहे. ते मुख्यमंत्र्यांचे भाऊ आहेत म्हणून त्यांना कायदा वेगळा आहे का? मी तुम्हाला शब्द देतो की राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला नाही. तर त्यांनी जिथं सभा घेतली तिथंच त्यांच्यापेक्षा दुप्पट मोठी सभा मी घेईन, असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला आहे. इम्तियाज जलील यांच्या या इशाऱ्यानंतर राज्य सरकार आता काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.