Imran Khan On PM Narendra Modi: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल ही इच्छा केली व्यक्त

0

दि.22: Imran Khan On PM Narendra Modi: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना टीव्हीवर डिबेटचा प्रस्ताव दिला आहे. मंगळवारी, इम्रान खान म्हणाले की, दोन शेजारी देशांमधील मतभेद दूर करण्यासाठी मला नरेंद्र मोदींसोबत टीव्ही डिबेटमध्ये चर्चा करायला आवडेल.

रशिया टुडेला (Russia Today) दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान म्हणाले, ‘मला नरेंद्र मोदींसोबत टीव्हीवर चर्चा करायला आवडेल.’ चर्चेतून हा प्रश्न सोडवता आला तर भारत आणि पाकिस्तानच्या अब्जावधी लोकांसाठी ते फायदेशीर ठरेल, असे ते म्हणाले.

मुलाखतीदरम्यान इम्रान खान यांनी भारतावर आरोप केला की त्यांनी वाटाघाटीसाठी पुढाकार घेतला असूनही भारत सरकारने त्याला कोणतेही सकारात्मक उत्तर दिले नाही. ते म्हणाले की, भारत आता अतिरेकी विचारसरणीने व्यापला आहे.

इम्रान खान म्हणाले, ‘ज्यावेळी माझा पक्ष 2018 मध्ये सत्तेत आला, तेव्हा मी भारताकडे हात पुढे केला होता. मी म्हणालो की आपण बसून काश्मीर प्रश्नावर चर्चा करू आणि हा प्रश्न सोडवू. मी भारताला चांगले समजतो. मी भारतासोबत जवळपास 10 वर्षे क्रिकेट खेळलो आहे. पण जेव्हा मी भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला, तेव्हा मला वाटले की हा मला माहीत असलेला भारत नाही. इम्रान खान म्हणाले की, नाझींनी प्रेरित केलेल्या वर्णद्वेषी विचारसरणीने भारत व्यापला आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने इम्रान खान यांच्या वक्तव्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रतिक्रिया मागितली होती, परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.

भारतासोबतच्या व्यापारावर इम्रान खान म्हणाले

भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर 2019 सालापासून भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार बंद आहे. भारतासोबतच्या व्यापारावर बोलताना इम्रान खान म्हणाले, ‘भारत आमचा विरोधी देश बनला आहे, त्यामुळे त्यांच्यासोबतचा व्यापार कमी झाला आहे.’

यासोबतच इम्रान खान म्हणाले की, पाकिस्तानचे धोरण सर्व देशांशी व्यावसायिक संबंध ठेवण्याचे आहे. इम्रान खान यांचे हे वक्तव्य त्यांचे व्यावसायिक सल्लागार अब्दुल रझाक दाऊद यांच्या अलीकडच्या टीकेशी सुसंगत आहे. दाऊदने सोमवारी म्हटले होते की, भारतासोबत व्यापार करणे ही काळाची गरज आहे आणि ते पाकिस्तानसाठी अधिक फायदेशीर ठरेल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here