आर्यन खान ड्रग प्रकरणात हायकोर्टाचे महत्वाचे निरीक्षण

0

मुंबई,दि.20: एनसीबीने (NCB) क्रूझ ड्रग पार्टीवर (Cruise drug party) कारवाई करत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही (Aryan Khan) अटक केली होती. मुंबई हायकोर्टाने आर्यन खान जामीन अर्जावर महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. ‘आर्यन खानच्या मोबाईलमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स पाहिल्यास त्यात काहीही आक्षेपार्ह दिसत नाही आणि आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाझ मर्चंट व मुनमुन धमेचा या तिघांनी कोणतेही कट कारस्थान रचल्याचे त्यातून स्पष्ट होत नाही. याविषयीच्या एनसीबीच्या आरोपात तथ्य दिसत नाही’, असे महत्वाचे निरीक्षण मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी नोंदवले आहे.

जामिनाविषयीच्या आदेशाची सविस्तर प्रत आज झाली उपलब्ध झाल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे. हायकोर्टाचे हे निरीक्षण म्हणजे एनसीबीला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी 28 ऑक्टोबर रोजी आर्यन खानला जामीन मंजूर केला होता. त्याविषयीच्या मुख्य आदेशाची प्रत त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 ऑक्टोबर रोजी दुपारी उपलब्ध केली. त्यानंतर जामिनासाठी हमीदार देण्याची व अन्य कायेदशीर प्रक्रिया संध्याकाळी वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने आर्यनला ती रात्रही आर्थर रोड तुरुंगात काढावी लागली. त्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी आर्यन जामिनावर तुरुंगातून बाहेर आला.

आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्याकडे कमर्शिअल क्वांटिटीमध्ये अंमली पदार्थ सापडलेत असं प्रथमदर्शनी तरी दिसत नाही. त्यांचा गुन्ह्यात सहभाग आहे हे या टप्प्यावर सांगणे कठीण आहे, असं कोर्टाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे.

तसंच, त्यांनी गुन्हेगारी षडयंत्र रचले आहे असे अनुमान काढण्यासाठी कोणतेही आधारभूत कारण सध्या तरी दिसत नाही, असंही कोर्टाने म्हटलं आहे.

एनसीबीने आर्यन खानच्या फोनमधून घेतलेल्या व्हॉट्सॲप चॅटचा दाखल देत तो कटात सहभागी असल्याचा दावा केला होता. पण, या चॅटमध्ये आर्यन आणि अरबाज मर्चंट किंवा तिघांनीही इतर आरोपींसोबत एनसीबीने आरोप केल्यानुसार कोणताही कट रचला हे असे आक्षेपार्ह काहीही प्रथमदर्शनी तरी दिसत नाही, असंही निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here