लाऊड स्पीकरबाबत राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक

0

मुंबई,दि.3: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) लाऊड स्पीकरला विरोध दर्शवत 4 मेचा अल्टिमेट दिला आहे. मशिदीवरील भोंगे (Loudspeaker Controversy) आणि हनुमान चालिसासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नवी घोषणा करण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थावर राज ठाकरे आणि निवडक मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यामुळे आज शिवतीर्थवर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.

मशिदीवरील भोंगे उतरवा नाहीतर दुप्पट पटीनं लाऊडस्पीकरवर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावू असा इशारा राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभेतून दिला आहे. 4 मे पासून मनसेच्या आंदोलनाला सुरुवात होईल असं त्यांनी जाहीर केलं होतं. आज रमजान ईद असल्यामुळे आणि राज ठाकरेंनी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे राज ठाकरेंच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

राज ठाकरेंनी औरंगाबादमधील सभेतही भोंग्यांबाबतची आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आज अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून राज्यात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण अचानक राज ठाकरेंनी काल पत्रक जारी करुन आजचा महाआरतीचा कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याचं जाहीर केलं. तसंच भोंग्यांबाबतच्या निर्णयावर आपली भूमिका आज जाहीर करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. याच पार्श्वभूमीवर सकाळी नऊ वाजता मनसेच्या महत्वाच्या नेत्यांसोबत राज ठाकरे ‘शिवतीर्थ’वर बैठक घेत आहेत. त्यानंतर ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत. 

राज ठाकरेंच्या या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ते आता कोणती नवी घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. दुसरीकडे राज्याचं पोलीस खातं अलर्ट मोडवर असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तसंच राज्याच्या गृहखात्याच्या वतीनं कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास राज्य सरकार सक्षम असल्याचं सांगण्यात आलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here