आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा महत्वाचा निर्णय

0

मुंबई,दि.२०: आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेनेच्या ठाकरे गट, शिंदे गटाच्या एकूण ३४ याचिका आहेत. या सर्व ३४ याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली.यावर आज (२० ऑक्टोबर) झालेल्या सुनावणीत राहुल नार्वेकरांनी ३४ याचिका ६ गटात एकत्र करून या ६ याचिकांवर सुनावणी करण्याचा निर्णय घेतला. तसेच पुढील सुनावणी २६ ऑक्टोबरला ठेवण्यात आली आहे.

यावेळी राहुल नार्वेकरांनी दोन्ही पक्षांना २५ ऑक्टोबरपर्यंत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत सादर केलेली कागदपत्रे विधानसभा अध्यक्षांसमोर सादर करण्याचेही आदेश दिले. त्यामुळे आता या सुनावणीत नेमकं काय होतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

नार्वेकरांकडून नाराजी व्यक्त

ठाकरे गटाने सुनावणीत एक अर्ज दाखल करत शिंदे गटाकडून काही कागदपत्रांची मागणी केली. यावर राहुल नार्वेकर नाराजी व्यक्त करत म्हणाले, “ठाकरे गट प्रत्येक सुनावणीत नवा अर्ज करत आहे. यामुळे वेळ वाया जाऊन सुनावणी लांबणीवर जाईल. ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात एक भूमिका घेतो आणि विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणीत वेगळी भूमिका का घेत आहे?”

कुणीही माणूस सांगेल की…

दरम्यान, या मुद्द्यावर असीम सरोदे म्हणाले होते, “सत्तासंघर्षाच्या संदर्भातील ३४ याचिकांची सुनावणी एकत्रित व्हावी ही अतिशय रास्त, योग्य आणि कायदेशीर मागणी आहे हे महाराष्ट्रातील समस्त जनतेला माहिती आहे. वकील नसलेला आणि कायदा न वाचलेला कुणीही माणूस सांगेल की, एकाच राजकीय घटना व परिस्थितीतून निर्माण झालेल्या विषयावर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी अगदीच बरोबर आहे.”

“असं असलं तरी एखाद्या प्रकरणाला जास्तीत जास्त लांबवू शकेल, विलंब करू शकेल आणि केसमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार करू शकेल अशा लोकांना हुशार समजण्याची पद्धती समाजाने बदलल्याशिवाय कायद्याच्या प्रक्रियांमध्ये उत्तरदायित्व व पारदर्शकता आणता येणार नाही,” असं मत असीम सरोदे यांनी व्यक्त केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here