Raj Thackeray : पुन्हा असा प्रकार महाराष्ट्रात घडला तर यांना सोडायचं नाही : राज ठाकरे

0

अमरावती,दि.18: महाराष्ट्रात अमरावती हिंसाचारा सारखी पुन्हा घटना घडली तर यांना सोडायचं नाही, असं विधान मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं आहे. राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर होते. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राज ठाकरेंच्या या विधानानंतर सभागृहात कार्यकर्त्यांकडून ‘जय श्री राम’च्या जोरदार घोषणा सुरू होत्या. राज ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यात ते विविध ठिकाणी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन पुढील निवडणुकीसाठी जोमानं तयारीला लागण्याच्या सूचना करत आहेत. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर अमरावतीला रवाना झाले होते. यावेळी अमरावतीत राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आक्रमक भाषण केलं. “अमरावतीमध्ये जो प्रयत्न झाला तो प्रयत्न जर पुन्हा महाराष्ट्रात झाला तर यांना सोडायचं नाही. आता इथून परत जेव्हा घरी जाल त्यावेळी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला सांगायचं आपल्या घरावर आणि घराच्या चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडकला पाहिजे. नवीन वर्षापासून धुमधडाका सुरू करू”, असं राज ठाकरे म्हणाले. 

त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद अमरावतीत उमटले होते आणि हिंसाचार घडला होता. त्यामुळे शहरात संचारबंदी लागू करण्याची वेळ आली होती. तसंच इंटरनेट सेवा देखील खंडित करण्यात आली होती. हजारोंच्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले होते आणि तोडफोड करण्यात आली होती. हिंसाचारत पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस जखमी झाले होते. नागपूर, अकोला, यवतमाळ, वाशिम येथून अतिरिक्त पोलीस कुमक बोलवावी लागली होती. याच हिंसाचाराच्या घटनेचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी अमरावतीच्या दौऱ्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखठोक सूचना केल्या आहेत. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here