तपासयंत्रणा चुकीच्या वाटत असतील तर संजय राऊत यांनी न्यायालयात जाऊन दाद मागावी

0

मुंबई,दि.९: शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मदत करण्यास नकार दिल्यानंतर ईडीने त्यांच्यासह कुटुंबीयांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तपास यंत्रणेच्या माध्यमातून केंद्र सरकार त्रास देत असल्याचे राऊत यांनी म्हटले होते. तसेच तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे म्हटले होते. यानंतर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

संजय राऊत हे कालपर्यंत नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपच्या अगदी लहान कार्यकर्त्यावरही टीका करत होते. मग आता ‘ईडीच्या’ चौकशीची वेळ आल्यावर संजय राऊत कशाला घाबरत आहेत?, असा सवाल भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला. ‘ईडी’च्या कारवाईमुळे संजय राऊत (Sanjay Raut) खूप घाबरले आहेत. पण कर नाही त्याला डर कशाला? त्यामुळे संजय राऊत यांनी ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊन सर्व खुलासा करावा. यापूर्वी ईडीने त्यांच्या पत्नीचीही चौकशी केली होती. त्यामध्ये काही निष्पन्न झाले नव्हते. एरवीही संजय राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊ, असे सातत्याने बोलत असतात. मग आताच काय झाले, असा प्रश्न अतुल भातखळकर यांनी विचारला. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


तसेच संजय राऊत यांना केंद्रीय तपासयंत्रणा चुकीच्या वाटत असतील तर त्यांनी न्यायालयात जाऊन दाद मागावी. पण बेलगाम आरोप करु नयेत. परंतु, न्यायालयात गेल्यानंतर संजय राऊतांचे सगळे काळे धंदे दोन मिनिटांत समोर येतील. त्यामुळे संजय राऊत यांनी फुशारक्या मारु नयेत. जे असेल ते न्यायालयात जाऊन सांगावे. संजय राऊत यांनी आपणहून आपल्या कृत्यांची माहिती ईडीला द्यावी. मग इतरांना त्यांचे धंदे उघडकीस आणण्याची वेळ येणार नाही, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले. तसेच स्वत:वर कारवाई होते तेव्हा प्रत्येकालाच आणीबाणी वाटते, असेही भातखळकर यांनी सांगितले.

संजय राऊतांनी पत्रकारपरिषदेत सौदेबाजी केली: सुधीर मुनगंटीवार

संजय राऊत यांना जनता गांभीर्याने घेत नाही. ते राज्यसभेसारख्या पवित्र सभागृहाचे सदस्य आहेत. राज्यसभेच्या सदस्याने मर्यादा आणि उंचीचे उल्लंघन कसे करु नये, याचे संजय राऊत हे मूर्तीमंत उदाहरण आहे. आम्ही जेलमध्ये गेलो तर तुम्हीही जेलमध्ये जाल, ही धमकी आहे. संजय राऊत यांची आजची पत्रकारपरिषद म्हणजे सौदेबाजीचा प्रकार होता. आम्हीही तुमच्यावर कारवाई करणार नाही आणि तुम्ही आमच्यावर कारवाई करु नका, असे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here