पेट्रोलचे दर २०० रुपये लीटरच्या पुढे गेल्यास ट्रीपल सीट प्रवास करण्याची मूभा : भाजप नेत्याचं वक्तव्य

0

दि.२१: पेट्रोलचे दर वाढतच आहेत. डिझेलचे दरही वाढत आहेत. वाढणाऱ्या दरांमुळे वाहतुकीचा खर्च वाढल्याने इतर वस्तू, भाजीपाला महाग झाले आहे. इंधनदरवाढ हा सध्या देशातील ज्वलंत विषय आहे. रोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. मागील २० दिवसांमध्ये तब्बल १५ वेळा इंधनदरवाढ झालीय. या इंधनदरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसतोय. इंधनाचे दर कमी होण्याची सध्या तरी काही चिन्हं दिसत नाहीयत. या इंधनदरवाढीबद्दल सर्व सामान्यांमध्ये चिंतेचा स्वर उमटताना दिसत आहे. मात्र ही दरवाढ योग्य किंवा अनिवार्य असल्याचे खुलेसा करताना सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे नेते वाटेल ती स्पष्टीकरणं देत आहेत.

तालिबानला दोष देणं, मोफत लस दिल्यामुळे इंधन भडका झाला म्हणणं किंवा इंधनाचे दर वाढलेत तर सायकल चालवा ती आरोग्यासाठी फायद्याची असते असा युक्तीवाद करण्याचे प्रकार भाजपा नेत्यांनी केले आहेत. मात्र आता याच अजब युक्तीवादामध्ये आणखीन एका विचित्र वक्तव्याची भर पडलीय. ही भर पाडणारा नेता आहे, आसामचे भाजपाचे अध्यक्ष.

आसाम भाजपाचे अध्यक्ष भाबेश कालिता यांनी पेट्रोलच्या दरांसंदर्भात भाष्य करताना अजब दावा केलाय. पेट्रोलचे दर २०० रुपये लीटरच्या पुढे गेल्यास ट्रीपल सीट प्रवास करण्याची मूभा आसामध्ये देण्यात येईल असं म्हटलंय. “पेट्रोलचे दर लीटर मागे २०० रुपयांवर पोहचल्यानंतर दुचाकी गाड्यांवर तिघांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात येईल. तसेच एका बाईकवर तीन जणांना प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यासाठी सरकारकडून सहमती घेण्यात येईल. दुचाकी वाहनांवर तीन जणांची बसण्याची सोय असणाऱ्या गाड्या निर्माण करण्याची परवानगीही घेता येईल,” असं कालिता म्हणालेत. मात्र कालिता यांनी केलेलं हे वक्तव्य गांभीर्याने केलं की मस्करीमध्ये केलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्याच्या कायद्यानुसार दुचाकीवरुन तिघांनी प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here