सोलापूर,दि.24: Hyderabad Bangalore Bus Accident: व्हॉल्वो बसला दुचाकीनीने धडक दिल्यानंतर बसला भीषण आग लागली, आगीत होरपळून 20 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे हैदराबाद-बंगळूर महामार्गावर एका व्हॉल्वो बसला दुचाकीला धडक दिल्यानंतर भीषण आग लागली. हैदराबादहून बंगळुरूला जाणाऱ्या बसमध्ये एकूण 40 जण होते. दुर्घटना इतकी मोठी होती की, काही मिनिटातच बस आगीत जळून खाक झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच अनेकजण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे.
कावेरी ट्रॅव्हल्सची खासगी स्लीपर कोचची बस आहे. एका दुचाकीने धडक दिल्यानंतर बसने भीषण पेट घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीनंतर हा अपघात झाला, त्यावेळी बसमधील अनेक प्रवासी गाढ झोपेत होते. दुचाकीच्या धडकेमुळे बसच्या इंधन टाकीजवळ आग लागली आणि ती काही क्षणातच संपूर्ण बसमध्ये पसरली. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की प्रवाशांना बाहेर पडायला फारसा वेळ मिळाला नाही.
“दुपारी 3 वाजताच्या सुमारास कावेरी ट्रॅव्हल्सची व्हॉल्वो बस हैदराबादहून बंगळुरूला जात होती. ती एका दुचाकीला धडकली. धडकेनंतर दुचाकी बसखाली अडकली. त्यामुळे कदाचित ठिणगी पडली आणि आग लागली,” असं कुरनूलचे पोलिस अधीक्षक विक्रांत पाटील यांनी सांगितलं आहे. “ही एसी बस असल्याने प्रवाशांना खिडक्या फोडाव्या लागल्या. जो कोणी काच फोडू शकले ते सुरक्षित आहेत,” असंही त्यांनी सांगितलं.








