घरात घुसुन खुनी हल्ला केल्याप्रकरणी पती पत्नीची निर्दोष मुक्तता

ॲड. अभिजीत इटकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी काकडे यांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली

0

सोलापूर,दि.१८: घरात घुसुन खुनी हल्ला केल्याप्रकरणी पती पत्नीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दि.२९/०४/२०१४ रोजी शंकर दत्तात्रय देशपांडे व त्यांची पत्नी यांनी यातील फिर्यादी मनोज यशवंत गजेंद्रगडकर, दक्षिण कसबा, डोणगांवकर वाडा, सोलापूर यांच्या घरामध्ये घुसुन पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन दगडाने सदर फिर्यादी व त्यांची पत्नी व त्यांचा मेव्हणा संदिप गौतमे यांच्यावर खुनी हल्ला चढवला व तसेच आरोपी शंकर देशपांडे यांनी संदिप गौतमे यांच्या हाताच अंगठयास जोरात चावा घेवून सदर अंगठा फ्रैक्चर केला. अशा अशयाची फिर्याद फिर्यादी मनोज यशवंत गजेंद्रगडकर यांनी दि. २९/०४/२०१४ रोजी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे येवून दिली.

त्याप्रमाणे सदर आरोपींना पोलीसांनी अटक करुन सदर गुन्हयाचा तपास करुन दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. सदर खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकार पक्षाकडून एकुण ५ साक्षीदार तपासण्यात आले. त्या साक्षीदारांपैकी फिर्यादी तसेच इतर प्रत्यक्ष घटना बघणारे साक्षीदार व सदर केसचे तपास अधिकारी यांची उलट तपासणी सदर खटल्यास कलाटणी देणारी ठरली.

सदर आरोपीतर्फे ॲड. अभिजित इटकर यांनी असा युक्तीवाद केला की, घटनेच्या दिवशी फिर्यादीने सदर आरोपींना स्वतःच्य घरी खोटे सांगून बोलावून घेतले व उलटपक्षी पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन सदर आरोपी पती-पत्नी यांना जबर मारहाण केली व त्यापोटी यातील आरोपी शंकर देशपांडे यांनी सदर फिर्यादी व त्याच्या मेव्हण्या विरुध्द फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे दि.२९/०४/२०१४ रोजी फिर्यादी दाखल केली. परंतू सदरची फिर्याद मुद्दामहून सरकार पक्षाने कोर्टापासून लपवून ठेवली. तसेच सरकारपक्षा प्रमाणे जिथे सदर सरकारी साक्षीदारांवर हल्ला झाला. त्या ठिकाणी कुठलेही रक्त आढळून आले नाही. परंतू सदर घटना स्थळाजवळ एक तुळशीचा जड कुंडा होता व तो कुंडा उचलून सदर आरोपीवर यातील जखमी साक्षीदार संदिप गौतमे यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न करतेवेळी त्यांचा अंगठा त्या कुंडया खाली अडकला व त्यामुळे त्या अंगठयास जबर जखम झाली व काही रक्त त्या तुळशीच्या कुंडयाजवळ सांडले.

परंतू पोलीसांनी सदर तुळशीचा कुंडा किंवा तुळशीच्या कुंडयाजवळ असलेल्या परिसराचा कुठलाही पंचनामा मुद्दामहून केला नाही व तशी घटनास्थळा जवळची सत्य परिस्थिती कोर्टा समोर आणली नाही. तसेच सदर घटनेबाबतची प्रथमतः पोलीसांना दिलेली माहिती ही वेगळी होती व कोर्टासमोर विचार करुन रंगवलेली केस सादर करण्यात आलेली आहे. असा युक्तवादी आरोपींच्या वकिलांनी केला. त्याकरीता यातील आरोपींचे वकिल ॲड. अभिजीत इटकर यांनी अनेक उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निवाडे न्यायालयासमोर दाखल केले.

सदर आरोपींच्या वकिलांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी काकडे यांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. संतोष आवळे, ॲड. राम शिंदे, ॲड. मनोज व्हनमारे, ॲड. फैय्याज शेख, ॲड. युवराज आवताडे या वकिलांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here