आर्यन खानच्या जामिनावरील सुनावणीसाठी कोर्टात प्रचंड गर्दी, गर्दी पाहून न्यायमूर्ती उठून गेले!

0

मुंबई,दि.२६: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग प्रकरणात अजून जामीन मिळाला नाही. क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी कोर्टात झालेली प्रचंड गर्दी पाहून न्यायमूर्ती संतापले आणि न्यायासनावरून उठून गेले.

ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानला आज तरी जामीन मिळणार का, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. थोड्याच वेळात त्याच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. शाहरुख खान यानं आर्यनच्या सुटकेसाठी वकिलांची फौज उभी केली आहे. आर्यनच्या जामिनावरील सुनावणीसाठी कोर्टात आज मोठी गर्दी झाली होती. आर्यन प्रकरणाशी संबंध नसलेल्या वकिलांनीही गर्दी केली होती. ही गर्दी पाहून न्यायमूर्ती नितीन सांब्रे न्यायासनावरून उठून गेले आणि करोना सुरक्षितता नियमांचे पालन करण्याची व्यवस्था करावी, असं त्यांनी कोर्ट असोशिएटना सांगितलं. न्यायमूर्तींच्या आदेशानुसार गर्दी कमी करण्यास सुरुवात केली आहे. ज्यांचे प्रकरण सुनावणीला नाही, त्यांना कोर्टाबाहेर जाण्याचे निर्देश असोशिएटनं दिले आहेत. त्यामुळं न्यायालयीन कामकाज थांबलं आहे.

असोशिएटच्या निर्देशानुसार पोलिसांनी आता सगळ्यांना बाहेर काढलं आहे. सर्व पत्रकारांनाही बाहेर काढलं आहे. आर्यनच्या प्रकरणाची सुनावणी सुरू होण्यापूर्वी पत्रकारांना प्रथम प्रवेश दिला जाईल, अशी हमी कोर्टाच्या असोशिएटनं दिली आहे.

आर्यनच्या जामिनासाठी यापूर्वी ॲड. सतीश मानेशिंदे, अमित देसाई यांनी युक्तिवाद केला आहे. आता ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी आर्यनसाठी युक्तिवाद करणार आहेत. या प्रकरणासाठी त्यांची टीम लंडनहून आली आहे. एनसीबीनं आर्यनला जामीन मिळू नये म्हणून जय्यत तयारी केली आहे. सुनावणीआधीच प्रतिज्ञापत्र दाखल करत एनसीबीनं आर्यनच्या जामिनास तीव्र विरोध केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here