सोलापूर,दि.13: Solapur: पारतंत्र्यातही तिरंगा ध्वज डौलाने फडकवणाऱ्या आणि 4 दिवस स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या क्रांतिभूमी सोलापूर नगरीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नवा इतिहास घडला. महापालिकेच्या आवारात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या तब्बल शंभर फुटी उंच स्तंभावर दिमाखात ध्वजारोहण करण्यात आले. शानदार असा सोहळा देशभक्तीमय वातावरणात शनिवारी सकाळी नऊ वाजता पार पडला. “याची देही याची डोळा” उपस्थितांनी हा स्फूर्तीदायी सोहळा पाहिला. अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये हा क्षण टिपला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार “हर घर तिरंगा” हा उपक्रम 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येत आहे. याची जय्यत तयारी महापालिका प्रशासनाने केलीय. दरम्यान , हा अमृत महोत्सव वैशिष्ट्यपूर्ण व्हावा यासाठी महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्या संकल्पनेतून महापालिका आवारात 100 फूट उंच ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. या स्तंभावर 20 बाय 30 फूट आकाराचा भव्य दिव्य असा तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. शनिवारी सकाळी नऊ वाजता महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते दिमाखदार ध्वजारोहण सोहळा देशभक्तीमय वातावरणात पार पडला.
यावेळी ढोल पथकाने बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो ! यासह विविध देशभक्तीपर गीतांच्या तालावर अप्रतिम सादरीकरण केले. अग्निशामक दल प्रमुख केदारनाथ आवटे यांच्या नेतृत्वाखाली दलाने शिस्तबद्धपणे सलामी दिली.
आयुक्त शिवशंकर यांच्या हस्ते विद्युत बटन दाबून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त विद्या पोळ, सहाय्यक उपायुक्त विक्रमसिंह पाटील, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार , नगर अभियंता संदीप कारंजे, सहाय्यक संचालक नगर रचना केशव जोशी, सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी, आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, पाणीपुरवठा अधिकारी मठपती, महिला व बालकल्याण समिती अधिकारी विठ्ठल कस्तुरे , अग्निशामक दलाचे प्रमुख केदारनाथ आवटे, महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख एड. अरुण सोनटक्के, वैद्यकीय अधिकारी हराळे , उद्यान विभाग अधीक्षक रोहित माने , झोन अधिकारी चौबे, दिवाणजी, कामगार कल्याण अधिकारी विनोद कुलकर्णी, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार, आरोग्य निरीक्षक मेंडगुळे, मल्लेश नराल आदींसह झोन अधिकारी व महापालिकेचे इतर अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थित होती. महापालिकेचे सर्व अधिकारी हातात तिरंगा घेऊन यावेळी सहभागी झाले होते. याप्रसंगी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते लाडू वाटप करण्यात आले.
भव्य दिव्य ध्वज फडकवण्याचे भाग्य मिळाले : आयुक्त पी. शिवशंकर
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिका आवारात भव्य दिव्य अशा 100 फूट उंच स्तंभावर ध्वज फडकवण्याचे भाग्य मला मिळाले. हा अविस्मरणीय क्षण आहे. महापालिकेतील सर्वांनी यासाठी टीमवर्क केले. “हर घर तिरंगा” उपक्रमांतर्गत सोलापूर शहरातील प्रत्येक नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपापल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवून आपला देशाभिमान व्यक्त करावा, असे आवाहन शिवशंकर यांनी यावेळी केले.
हा तिरंगा ध्वज कायमस्वरूपी 24 तास डौलाने फडकत राहणार
महापालिका आवारात “आय लव्ह सोलापूर” या सेल्फी पॉईंटच्या बाजूला दिमाखदार असा भव्य आणि दिव्य असा 100 फुटी स्तंभावर फडकणारा तिरंगा ध्वज आणि त्यामागे इंद्रभुवनची सुंदर इमारत असे डोळ्याचे पारणे फेडणारे मनोहारी दृश्य पाहायला मिळाले. महापालिका आवारात 100 फुटी स्तंभावर तिरंगा ध्वज कायमस्वरूपी 24 तास डौलाने फडकत राहणार आहे.