एचआयव्ही बाधित रुग्णांना सर्वसामान्य माणसाप्रमाणे वागणूक मिळाली पाहिजे: मनीषा आव्हाळे

0

सोलापूर,दि.1: एचआयव्ही / एड्स बाधित रुग्णांना समाजामध्ये सर्वसामान्य माणसाप्रमाणे वागणूक दिली पाहिजे, पीडिताप्रती समाजाने भेदभाव करू नये. ह्या आजारावर योग्य औषध उपचार घेतल्यानंतर मात करता येते. बाधित रुग्णांनी आजार झाल्यानंतर घाबरून न जाता योग्य वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले.

1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. यानिमित्त आयोजीत जनजागरण रॅलीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले, त्याप्रसंगी श्रीमती आव्हाळे बोलत होत्या.

​या रॅलीस सोलापूर शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. सुधीर देशमुख, उपअधिष्ठता डॉ. जयकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, वैद्यकीय अधिकारी डॉ. अग्रजा चिटणीस, नोडल ऑफीसर डॉ. विठ्ठल धडके, सुक्ष्मजीव शास्त्र विभागाचे डॉ. विजय चिंचोळकर आदी मान्यवर तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजामध्ये एचआयव्ही/एड्स आजराबाबत अनेक गैरसमज आहेत. याविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून हे गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. फक्त एक डिसेंबर रोजी जनजागृती न करता तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन या आजाराविषयी लोकांचे नियमित प्रबोधन करणे आवश्यक असल्याचे मत पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी व्यक्त केले.

यावर्षीच्या जागतिक एड्स दिनानिमित्तची थीम ‘आता नेतृत्व आघाडी समुदायाची’ ही असून जे लोक एचआयव्ही संसर्गित आहे त्यांना समाजात भेदभावाचा सामना करावा लागतो अशा परिस्थितीत पीडितासोबतचा भेदभाव संपवून त्यांना सन्मान देण्यावर यावर्षी भर देण्यात आला आहे, अशी माहिती अधिष्ठता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here