मुंबई, दि.१०: Hindu-Muslim Unity: कर्नाटक हिजाब प्रकरणाचे पडसाद संपूर्ण भारतभर उमटले आहेत. जानेवारी महिन्यात उडुपी येथील एका सरकारी महाविद्यालयातील 6 विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करून महाविद्यालयात प्रवेश घेतल्याने वाद सुरू झाला होता. कॉलेज प्रशासनाने विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास मनाई केली होती, परंतु तरीही त्यांनी तो परिधान केला होता, यावरून वाद निर्माण झाला होता. या वादानंतर इतर कॉलेजांमध्येही हिजाबबाबत गोंधळ सुरू झाला. अनेक ठिकाणी निदर्शने केली जात आहेत.
ठाण्यातील मुंब्रा येथे हिंदू मुस्लीम एकतेचे चित्र पाहायला मिळाले आहे. कर्नाटक येथे घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत आज मुंब्रा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आणि मुंब्रा येथील मुस्लीम महिलांनी संयुक्तपणे निषेध आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान मुस्लीम महिलांनी ‘जय श्री राम’, ‘भारत माता कि जय’चे नारे दिले. तर हिंदू महिलांनी ‘अल्ला हो अकबर’ चे नारे दिले. या दरम्यान मुंब्रा येथील महिलांनी हिजाब हा मुस्लीम धर्मातील महिलांचा पेहराव आहे त्याच्या बद्दल कुणाला काही त्रास होण्याचे कारण नसून आपली ती संस्कृती नसल्याचे महिलांनी सांगितले.
हिंदू धर्म असे सांगत नाही की एखादी मुलगी चालली आहे आणि अर्वाच्यपणे धार्मिक घोषणा द्या, शाळा किंवा महाविद्यालयीन विभाग हा धर्मविरहित असतो हे फक्त शिक्षण घेण्यासाठी असते, धर्माचा डंका वाजवण्यासाठी नाही. त्यामुळे धर्माचे राजकारण कुणीही शाळा किंवा शिक्षण संस्थांमध्ये करू नका, असे मत यावेळी मुंब्रा येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचे धार्मिक बाबींवर राजकारण केले जात असल्याचा आरोप मुंब्रा येथील महिलांनी केला आहे. या निषेधआंदोलना दरम्यान कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करत ‘राम के नाम पर मत बाट इन्सान को’, ‘भारत माता की जय, ‘अल्ला हो अकबर’ अशा जोरदार घोषणा दिल्या. या घोषणाबाजी दरम्यान हिंदू महिलांनी ‘अल्ला हो अकबर’च्या घोषणा दिल्या तर मुस्लीम महिलांनी ‘जय श्री राम’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या.