सोलापुरात तापमानाचा उच्चांक, राज्यात उष्णतेची लाट

0

सोलापूर,दि.५: सोलापूरसह राज्यात अनेक शहरातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. सोलापुरात आज ४१.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. किमान तापमानात देखील वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सोलापुरातील तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे शहरवासियांना सूर्यनारायणाची होरपळ सहन करावी लागत आहे.

त्यात पुढील १५ दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. पुढील काही दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

आबालवृध्दांसह सर्वजणच सकाळपासूनच उन्हाच्या तप्त झळांमुळे हैराण होत आहेत. दुपारच्यावेळी तर अक्षरशः अंगाची लाहीलाही होत आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारी अनेकजण बाहेर पडणे टाळत आहेत.

शहरात वाढत्या तापमानामुळे दुपारच्यावेळी गजबजलेले रस्तेही निर्मनुष्य असल्याचे चित्र दिसून येते. उन्हापासून बचावासाठी नागरिक टोप्या, छत्री, स्कार्फ, गमजे, रुमाल आदींचा वापर करताना दिसून येतात. उन्हामुळे घसा कोरडा पडत असल्याने शितपेयांच्या दुकानात व गाड्यांवर नागरिकांची गर्दी वाढली आहे.

बुधवारी शहरातील यंदाचे उच्चांकी तापमान ४२.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी तापमानाने आपला उच्चांक मोडत पारा ४२.४ अंशावर पोहोचला आहे. तर आज शुक्रवारी तापमान ४१.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here