सोलापूर,दि.21: फसवणूक केल्याप्रकरणी गीता अनिल श्रीराम वय 52 व अनिकेत अनिल श्रीराम वय 31 दोघे रा. पद्मनगर, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही.जी.बिस्त यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. (High court grants interim bail to both in financial fraud case)
यात हकीकत अशी की, 21 फेब्रुवारी 2018 रोजी फिर्यादी मोहम्मद जावेद मोहम्मद युसुफ कुरेशी वय 32 वर्षे, रा. तेलंगी पाच्छा पेठ,सोलापूर यास अनिल सिद्राम श्रीराम यांनी तीन कोटी रुपयाचे कर्ज मिळवून देतो म्हणून दहा टक्के कमिशन घेऊन सदर कर्ज मंजूर न झाल्यामुळे फिर्यादीची फसवणूक केल्याप्रकरणी अनिल सिद्राम श्रीराम व इतर चार लोकांविरुद्ध जेल रोड पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दिनांक 25/10/2021 रोजी दाखल झाला होता.
अनिल श्रीराम यांची पत्नी व मुलागा अनिकेत यांनी आपणास अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यावर त्यांनी ॲड. रितेश थोबडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला.
अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ॲड. रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवादात वर नमूद दोन्ही आरोपींना सदर गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नसल्याचा युक्तिवाद केला, तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी 20,000/- रुपयाच्या जातमुचलक्यावर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यात अर्जदारतर्फे ॲड. रितेश थोबडे व एडवोकेट सचिन इंगळगी तर सरकारतर्फे ॲड. अनामिका मल्होत्रा यांनी काम पाहिले.