सोलापूर,दि.२: विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सुरेश विश्वनाथ काळे रा. देगाव यांच्यासह तिघांच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एन. आर. बोरकर यांच्यासमोर होऊन न्यामुर्तींनी तिन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
या खटल्याची हकीकत अशी की, मयत ऋतुजा हिचा विवाह झाल्यानंतर सासरकडील नातेवाईकांनी ऋतुजा हिचा छळ चाजहाट चालू केला, आरोपींनी तिला शिवीगाळ मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास दिला व या त्रासाला कंटाळून दि. २०/०३/२०२२ रोजी ऋतुजा हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. अशा आशयाची फिर्याद विजय साळुंखे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिलेली होती.
त्यावरुन आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम ३०६, ४९८ (अ) प्रमाणे मोहोळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी सुरेश काळे, सुकेशना काळे व नंदा सुर्यवंशी यांनी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सोलापूर सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. या निर्णयाविरुध्द आरोपी सुरेश काळे, सुकेशना काळे व नंदा सुर्यवंशी यांनी ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एन. आर. बोरकर यांच्यासमोर झाली. जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी युक्तिवाद केला की दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपींनी मयतास त्रास दिल्यामुळे आत्महत्या करण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता, असा निष्कर्ष काढणे धोक्याचे आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजुर केला.
या खटल्यात आरोपींतर्फे ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲड. व्ही. बी. कोंढे देशमुख यांनी काम पाहिले.