बारामती,दि.3: इंदुरीकर महाराजांच्या (indurikar maharaj) लसीवर केलेल्या वक्तव्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी (rajesh tope) प्रतिक्रिया दिली आहे. मी कोरोनाची लस घेतली नाही आणि घेणारही नाही, असं वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केलं आहे. घोटी येथे कार्यक्रमात बोलताना इंदुरीकर महाराज यांनी कोरोना परिस्थिती व लसीबाबत खळबळ उडवून देणारे वक्तव्य केलं आहे. राजेश टोपे (rajesh tope) यांनी इंदुरीकर यांच्या वक्तव्याबाबत त्यांची समजूत काढणार असल्याचे सांगितले आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलताना कोरोनाच्या लसीकरणाबद्दल माहिती दिली. तसंच इंदुरीकर महाराज यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली.
इंदुरीकर महाराज यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये केलेल्या प्रबोधनातून समाजामध्ये जागृती होते. त्यामुळे त्यांच्या किर्तनाला मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. गेल्या दोन वर्षांपासून कीर्तन आणि प्रबोधन बंद असताना त्यांचा समाजातील जास्त संपर्क आला नाही. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली नसावी. जागतिक स्तरावर लसीकरणाचे महत्त्व सगळ्यांनी जाणलं आहे. महाराजांचा आध्यात्मिक अभ्यास जास्त आहे. मात्र, वैज्ञानिक बाजू देखील समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.