सोलापूर,दि.25: ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’ या म्हणीप्रमाणे लग्न होण्याआधीच उतावीळ झालेल्या वाग्दत्त नावाच्या वराने त्याच्या होणाऱ्या वधूला गुपचूपपणे घराबाहेर बोलावून दुचाकीवरून गावाशेजारील सामाजिक वनीकरणाच्या जंगलात फिरण्यासाठी म्हणून नेले आणि तेथे नको ते कृत्य केल्यामुळे त्यास सहा महिने सरकारी पाहुणचार घ्यावा लागला. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने या उतावळ्या वाग्दत्त वराची जामिनावर मुक्तता केली.
माढा तालुक्यातील एका तरूणाचा विवाह मोहोळ तालुक्यातील एका तरूणीबरोबर निश्चित झाला होता. लग्नाची सुपारीही फुटली होती. पुढे ठरल्यानुसार विवाह होणार होता. परंतु वाग्दत्त वराला वाग्दत्त वधूच्या सहवासाची अतिघाई झाली होती. एकेदिवशी हा उताविळ वाग्दत्तवर नियोजित पत्नीच्या गावी आला आणि तिच्या घराबाहेर उभे राहून तिला बोलावून घेतले. दोघेजण दुचाकीने नजीकच्या सामाजिक वनीकरणाच्या जंगलात एकांतात फिरण्यासाठी म्हणून गेले. हा आक्षेपार्ह प्रकार वाग्दत्त वधूच्या आईला अजिबात पसंत पडला नाही.
नंतर वाग्दत्तच्या वधूनेही घरी येऊन घडलेली आपबिती आईच्या कानावर घातली. आईने तात्काळ मोहोळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन नियोजित जावयाविरूध्द फिर्याद नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून वाग्दत्त वराला अटक केली. दरम्यान, सोलापूरच्या सत्र न्यायालयाने आरोपी वाग्दत्त वराला जामीन नाकारला. त्यामुळे त्याने ॲड. जयदीप माने यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असता त्यावर सुनावणी झाली.
वाग्दतच्या वधूने वैद्यकीय तपासणीच्यावेळी ‘तसा’ काही प्रकार झाला नाही, असे सांगितले होते. त्याचप्रमाणे वैद्यकीय तपासणीतही तसा कोणताही आक्षेपार्ह प्रकार घडला नसल्याचे दिसून आले होते. ही बाब निदर्शनास आल्यामुळे उच्च न्यायालयाने 30 हजार रूपयांच्या जातमुचलका आणि दर महिन्यास पोलीस ठाण्यात हजरी देण्याच्या अटीवर वाग्दत्त वराची जामिनावर मुक्ततेचा आदेश दिला.
याप्रकरणी उतावळ्या वाग्दत्त वरातर्फे ॲड. जयदीप माने व ॲड. बी. विलासिनी तर सरकारतर्फे ॲड. ए. ए. पालकर यांनी काम पाहिले. अखेर तब्बल सहा महिन्यांच्या सरकारी पाहुणचारानंतर उतावळा वाग्दत्त वर कारागृहातून बाहेर आला.