या भाजपा नेत्याने घेतली शरद पवार यांची भेट 

0

मुंबई,दि.3: भाजपाला आणखी एक धक्का बसणार आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीपूर्वी समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर लोकसभेला सोलापूरमधून विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपाची साथ सोडली. आता इंदापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार या शक्यतेने भाजपचे नेते आणि या मतदारसंघातील इच्छुक उमेदवार हर्षवर्धन पाटील पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे.

अशातच हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतली. एवढेच नाही तर त्यांच्या मुलानेही व्हॉट्सअप स्टेटसवर ‘तुतारी’ चिन्ह ठेवले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

हर्षवर्धन पाटील हे पवारांच्या राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू होती. त्यात आज सिल्व्हर ओकवर झालेल्या भेटीत हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीत जाणार हे निश्चित झालं आहे. पवारांकडूनही इंदापूर विधानसभेसाठी तुतारी चिन्हावर लढण्याचे संकेत हर्षवर्धन पाटील यांना मिळाल्याची माहिती समोर आली आहे. 

हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली. अर्थात यात किती तथ्य आहे हे उद्याच कळेल. शुक्रवारी इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील पत्रकार परिषद घेऊन पुढील रणनिती जाहीर करणार आहेत. त्यांनी तुतारी हाती घेतल्यास इंदापूरमध्येही अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना होण्याची शक्यता आहे. 

इंदापूर मतदारसंघात विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे असून ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत. महायुतीत ज्याचा आमदार त्या पक्षाला ती जागा सोडण्याचा फॉर्म्युला वापरण्यात आला. त्यामुळे इंदापूरची जागा अजित पवारांच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील नाराज होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here