एकनाथ शिंदेंच्या राजकीय हालचालीची माहिती उद्धव ठाकरेंना होती: हर्षल प्रधान

0

मुंबई,दि.23: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना वर्षावर बोलावलं आणि मुख्यमंत्री तुम्हाला व्हायचे असेल तर मी पायउतार होतो असे म्हटले होते. या घटनेला आदित्य ठाकरे साक्षीदार होते. शिंदेंच्या राजकीय हालचालीची माहिती उद्धव ठाकरेंना होती. आमदारांना माझ्यासमोर आणा, आपण चर्चेतून मार्ग काढू असं उद्धव ठाकरेंनी शिंदेंना कळवलं परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर आमदारांनी सूरत, गुवाहाटी गोवा प्रवास सुरू केला असा खुलासा शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी केला आहे.

हर्षल प्रधान म्हणाले की, मुख्यमंत्रिपदावर असलेल्या माणसाला प्रत्येक राजकीय व्यक्तीच्या हालचालीची माहिती असते. अख्खं पोलीस विभाग ही माहिती पुरवत असतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना काय प्रॉब्लेम आहे? असं विचारलं. तर आमदारांना भाजपासोबत जायचं आहे असं ते म्हणाले, तेव्हा उद्धव ठाकरेंनी ज्यांना भाजपासोबत जायचं आहे त्यांना माझ्यासमोर आणा, मी सगळ्यांशी बोलतो. त्यावर चर्चा करून मार्ग काढू असं उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं होतं. तेव्हा ठीक आहे मी घेऊन येतो असं शिंदेंनी म्हटलं परंतु त्यानंतर त्यांनी आमदारांना घेऊन सूरत, गुवाहाटी गाठलं असं त्यांनी सांगितले. न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीत ते बोलत होते.

तसेच भाजपाला शिवसेना संपवायची आहे. ही भाजपाची स्क्रिप्ट आहे. एकनाथ शिंदे यांचा वापर करून शिवसेना संपवण्याचा डाव आहे. यामुळे शिवसेना कमकुवत झाली नाही तर महाराष्ट्रातील मराठी माणसाची ताकद कमकुवत झाली. शिवसेनेचं नुकसान काय झालं? ज्या माणसाला सामान्य माणूस ते आमदार, खासदार बनवलं, मंत्री बनवलं हे कुणामुळे झालं? शिवसैनिक असल्यामुळेच त्यांना हे मिळालं. स्वत:च्या आजारपणाकडे उद्धव ठाकरेंनी लक्ष दिले नाही. शिवसेना हेच माझं कुटुंब आहे याचदृष्टीने काम करतात. शिवसैनिक आजही काम करतोय, आजही शिवसेना भवनात मराठी माणूस, हिंदू माणूस, मुस्लीम माणूस त्यांचे काम घेऊन येतोय असं प्रधान यांनी म्हटलं. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here