मुंबई,दि.१६: औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आता संयुक्त राष्ट्रांपर्यंत पोहोचला आहे. याकूब हबीबुद्दीन तुसी यांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांना पत्र लिहिले. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले.
कबरीच्या संरक्षणाची मागणी
तुसी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिव कार्यालयाला या प्रकरणाची दखल घेण्यास सांगितले. तसेच केंद्र सरकार आणि एएसआयला औरंगजेबाच्या कबरीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार पूर्ण कायदेशीर संरक्षण आणि सुरक्षा मिळावी यासाठी निर्देश द्यावेत अशी मागणीही करण्यात आली.
अखेरचा मुघल सम्राट बहादूर शाह जफरचा वंशज असल्याचा दावा याकूब हबीबुद्दीन तुसी करतात. याकूब यांचं म्हणणं आहे की, ही कबर ‘राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आलं आहे आणि प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा, 1958 अंतर्गत संरक्षित आहे.
पत्रात युनेस्को कन्व्हेन्शन- १९७२ चा उल्लेख
पत्रात, याकूबने जागतिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा संरक्षणावरील युनेस्को कन्व्हेन्शन – १९७२ चाही उल्लेख केला. भारतानेही या कन्व्हेन्शनवर स्वाक्षरी केल्याचे नमूद केले. अशा स्मारकांना हटवणे, दुर्लक्ष करणे किंवा बेकायदेशीर बदल करणे हे आंतरराष्ट्रीय दायित्वांचे उल्लंघन ठरेल, असे ते म्हणाले.