लहान भावाच्या प्रेमाची शिक्षा मोठ्या भावाला, रागाच्या भरात जेसीबीने घर पाडले!

0

मुंबई,दि.२५: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातून सामाजिक क्रौर्याची एक संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या मुलीने पसंतीच्या मुलाशी लग्न केल्याचा राग मनात धरून, मुलीच्या वडिलांनी मुलाच्या मोठ्या भावाचे घर चक्क जेसीबीने जमीनदोस्त केले. ही घटना घाटीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घेंघोली गावात घडली आहे.

नेमकं प्रकरण काय?

घेंघोली येथील रहिवासी वनिया सिंह गुर्जर यांचा धाकटा भाऊ रामलखन याने सिरोली गावातील किरण गुर्जर हिच्यासोबत प्रेमविवाह केला होता. दोघेही सज्ञान असून त्यांनी कायदेशीररित्या एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हे लग्न किरणचे वडील गिर्राज गुर्जर यांना मान्य नव्हते. यातूनच त्यांनी मुलाच्या कुटुंबावर सूड उगवण्याचे ठरवले.

जेसीबीने घराची नासधूस आणि दहशत

एका रात्री गिर्राज गुर्जर आपल्या साथीदारांसह जेसीबी घेऊन वनिया सिंह यांच्या घरासमोर पोहोचला. तिथे आरोपींनी केवळ शिवीगाळच केली नाही, तर जेसीबीच्या साहाय्याने घराच्या तीन खोल्या पूर्णपणे पाडून टाकल्या. या हल्ल्यामुळे वनिया सिंह यांचे कुटुंब इतके भयभीत झाले की, त्यांनी घर सोडून पळ काढला.

५ महिने विजनवासात काढले

आरोपींच्या दहशतीमुळे पीडित कुटुंब इतके हादरले होते की, त्यांनी पोलिसांकडे जाण्याचे धाडस देखील केले नाही. तब्बल ५ महिने हे कुटुंब गाव सोडून बाहेर भटकत होते. नुकतेच हे कुटुंब गावात परतल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

“तपासात ही घटना सत्य असल्याचे समोर आले आहे. पीडित कुटुंब प्रचंड दहशतीखाली असल्याने तक्रार देण्यास उशीर झाला. आता मुख्य आरोपी गिर्राज गुर्जर आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.”— रॉबिन जैन, CSP, ग्वाल्हेर


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here