गुरूशांत धुत्तरगांवकर यांची पोस्ट चर्चेत, अनेकांनी केले कौतुक 

0

सोलापूर,दि.१९: सोलापूर महापालिकेत भाजपची सत्ता आली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने ८७ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने भाजपचे ९ जण स्वीकृत सदस्य होऊ शकतात. माजी नगरसेवक गुरूशांत धुत्तरगांवकर (Gurushant Dhuttargaonkar) यांच्या नावाची चर्चा सुरू होती. या निवडणुकीत उभारणार नसल्याचे धुत्तरगांवकर यांनी अगोदरच स्पष्ट केले होते. मात्र आता त्यांनी स्वीकृत नगरसेवक होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अनेकजण सत्तेसाठी पदासाठी नेहमीच हपापलेले दिसून येतात. मात्र पद नको म्हणणारे कमी असतात. धुत्तरगांवकर यांचे कौतुक होत आहे. 

ज्या पदासाठी अनेकजण प्रयत्न, दबाव, समीकरणं आणि मागच्या दाराने वाट शोधत असतात, अशा राजकीय परिस्थितीत गुरूशांत दादा सारखे व्यक्तिमत्व पद नाकारत आहे. यावरूनच त्यांची विचारसरणी लक्षात येते. त्यांच्या सारख्या लोकांची राजकारणात गरज आहे. समाज माध्यमांवर दादा तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. 

गुरूशांत धुत्तरगांवकर यांची पोस्ट

समाज माध्यमांवर चालू असलेल्या चर्चेत सोलापूर महानगर पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या इच्छुकांमध्ये माझे नाव चर्चिले जात आहे. आज एका दैनिकात देखील माझ्या नावाचा उल्लेख वाचायला मिळाला. 

मी अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की, मी अशा कोणत्याच पदासाठी इच्छुक नाही. निवडणूक न लढविण्याबाबत मी स्वतः निर्णय घेतला होता, तसे जाहीरपणे सांगत देखील होतो. परंतु अनेकांना वाटायचे की, राजकीय भाष्य असेल, ऐनवेळी निवडणूक लढवेनच. मी तिथे ठाम राहिलो. मी आज ही अतिशय प्रामाणिकपणे सांगतोय, मला अशा कोणत्याच पदात काडीचाही रस नाही.  पालिकेच्या सभागृहात परत येण्याची थोडीपण इच्छा असती, तर मागच्या दाराने येण्यापेक्षा लढून येणंच मी पसंत केलं असतं. मी स्वतःहून राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. केवळ देवेंद्र दादा कोठे हे दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आहे, त्यांच्याकडून निश्चित शहराचा विकास होईल ही खात्री असल्याने मी त्यांच्यासोबत आहे. स्वतःला काही मिळवण्यासाठी मी सोबत नाही. 

महत्त्वाचं म्हणजे मी अगदी समाधानी विचाराने लांब राहतोय. या क्षेत्रात माझ्या खानदानातील कुणीच नसताना लोकांनी मला स्वीकारलं, लोकवर्गणीतून मला २०१७ च्या निवडणुकीत विजयी केलं. पालिकेच्या सभागृहात स्थायी समिती सदस्यपदी असो किंवा स्थापत्य समिती सभापतीपदी असो मला न मागता स्व. महेश अण्णा कोठे यांनी संधी दिली. शिवसेनेचे शहरप्रमुख सारखे मोठे पद मातोश्रीवर मी स्वतः नको म्हणत असताना महेश अण्णा कोठे आणि पुरुषोत्तम बरडे साहेबांनी घ्यायला लावलं. म्हणजेच समाजासाठी माझं जे काही योगदान असेल, त्यापेक्षा कैकपटीने जास्तच मला आजवर मिळालं आहे. मी नाराज होऊन बाहेर पडलो नाही. तर या क्षेत्रातून निष्कलंक बाहेर पडून इतरांना संधी मिळावी या हेतूने विचारपूर्वक लांब झालो.

पक्षवाढीसाठी झटलेले, भविष्यात शहर विकासासाठी प्रमाणिकपणे योगदान देऊ इच्छिणारे अनेक जण या पदासाठी इच्छुक आहेत, त्यापैकी योग्य व्यक्ती निवडल्या जाव्यात, हे माझे मनापासून म्हणणे आहे.

– गुरुशांत धुत्तरगांवकर


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here