जळगाव,दि.25: शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर आपली भूमिका स्पष्ट करत सर्व पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील जत तालुक्यातील 40 गावं कर्नाटकात विलीन होणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि अक्कलकोटवर दावा सांगितला होता.
महाराष्ट्रातील 40 गावं हे कर्नाटकात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रश्नासाठी सर्व पक्षांनी एकत्रित आला पाहिजे असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. या वक्तव्याला मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाठिंबा दर्शवला आहे. आज जळगावात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय राऊत यांच्या भूमिकेला मी पाठिंबा देतो, असं त्यांनी म्हटलं आहे. पहिले राज्य मग राष्ट्र हे उद्दिष्ट असलं पाहिजे. हे राज्य टिकवण्यासाठी अनेकांना आहुती दिली आहे. राज्यासाठी सर्वांनी आपला पक्ष बाजूला ठेवून एकत्र आला पाहिजे, असेही मत व्यक्त करत मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं. आधी राष्ट्र, राज्य मग पक्ष. संजय राऊतांची ही भूमिका असेल तर त्यांना पाठिंबा आहे. बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांनीही यासाठी काम केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही काल स्पष्ट केलं आहे की, एकही महाराष्ट्रातलं गाव हे कर्नाटकात जाणार नाही, राज्याकरता पक्ष बाजूला सारला पाहिजे, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
40 रेडे दर्शनासाठी गुवाहाटीला जात आहेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे गटाचे 40 रेडे गुवाहाटीला जात असल्याची टीका केली होती. याच टीकेवरून शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही आमदारांना रेडे म्हणत आमचे 40 रेडे दर्शनासाठी गुवाहाटीला जात असल्याचं म्हटलं आहे. भाजप शिंदे गटाची जिल्हा दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात मेळावा पार पडला या मेळाव्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील मंत्री आणि आमदार हे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला जाणार आहेत. मात्र जिल्हा दूध संघाची निवडणूक असल्याने पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे गुवाहाटीला जाणार नसल्याचे त्यांनी स्वत: स्पष्ट केले आहे.
पाटील म्हणाले की, निवडणूक असल्याने याबाबत मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली असून त्यामुळे मी गुवाहाटीला जाणार नसून आमचे बाकीचे आमदार जाणार असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांसह 40 रेडे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जात असल्याचे म्हणत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना उपहासात्मक टोला लगावला आहे.