जळगाव,दि.4: भाजपा आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणामध्ये झाला होता, असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. प्रसाद लाड यांच्या या वक्तव्यानंतर तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून, विरोधकच नाही तर सत्तेत असलेल्या शिंदे गटाकडून देखील भाजप आणि प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.
आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर राज्याचे मंत्री गुलाबराब पाटील (Gulabrao Patil) यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझे मंत्रिपद गेले तरी चालेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
गुलाबराव पाटील काय म्हणाले?
छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्य भाजप नेते प्रसाद लाड यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील याचा जोरदार शब्दात समाचार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवरायांबद्दल कोणीही चुकीचे बोलत असेल, तर तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला माफ केलं जाणार नाही असे मंत्री गुलाबराव पाटील म्हटले. छत्रपती शिवरायांच्या नखाची बरोबरी हे नालायक करू शकत नाही, मंत्रीपद गेल खड्ड्यात यांना सोडणार नाही असा आक्रमक इशाराही मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.
भाजप नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य सुरूच
भाजप नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर भाजप नेते, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. प्रसाद लाड यांच्या या वक्तव्यानंतर सर्वच थरातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.