Bhagat Singh Koshyari: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

0

मुंबई,दि.१२: Bhagat Singh Koshyari: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी अधिक काळ सांभाळण्यास असमर्थता दर्शविली होती. (Governor Bhagat Singh Koshyari’s resignation) तशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबई दौऱ्यात केल्याची माहिती त्यांनी स्वतःहून दिली होती. त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ही मागणी मान्य झाल्याची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर आता रमेश बैस येणार असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही समावेश आहे. (Governor Bhagat Singh Koshyari’s resignation)

विरोधकांकडून राज्यपालांचा विरोध होण्याची दाट शक्यता होती

काही दिवसांनी महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राज्यपाल अभिभाषण करत असतात. यावेळी विरोधकांकडून राज्यपालांचा विरोध होण्याची दाट शक्यता होती. नुकतेच दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे कोल्हापूरमधील नेते संजय पवार यांनी राज्यपालांविरोधात आक्रमक आंदोलन केले होते. मविआचे नेते सतत राज्यपाल हटाव मोहीम राबवत होते. त्यासाठी ते आग्रही होते. अखेर राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर विरोधकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री हा वाद कायमच रंगला

महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात कोश्यारी यांनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यापासून त्यांनी कायमच विरोधी भूमिका घेतली. राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री हा वाद कायमच रंगला. महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी कोश्यारी यांनी सोडली नाही. वाद एवढा टोकाला गेला होता की, मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी न दिल्याने सुमारे पाऊण तास थांबून राज्यपालांना सरकारी विमानातून खाली उरतावे लागले. सत्ताबदल झाल्यापासून कोश्यारी शांत होते. मात्र मध्यंतरी वादग्रस्त विधानांमुळे ते अडचणीत आले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले यांच्यासह अनेक महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपचीही कोंडी होत होती.

राज्यपाल पद सोडण्याची व्यक्त केली होती इच्छा | Governor Bhagat Singh Koshyari’s resignation

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १९ जानेवारी रोजी मुंबई दौरा संपन्न झाला होता. या दौऱ्यानंतर राज्यपाल भवनाने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले होते. त्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले होते. “महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here