दि.17:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नावाने खंडणी (extortion) मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल होताच मालवणी पोलिसांनी तिघांना अटक (Malavani police arrest 3 people) केली आहे. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेल्यांमध्ये सिनेसृष्टीतील तिघांचा समावेश आहे. या घटनेच्या संदर्भातील एक व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक महिला राज ठाकरेंचं नाव घेत एका सुरक्षारक्षकाला मारहाण करत आहे. राज ठाकरेंना तू ओळखत नाहीस का? काम कोणासाठी करतोस आणि महाराष्ट्रात, मुंबईत कसा राहतोस? असे सवाल करत आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये दिग्दर्शक मिलन वर्मा, निर्माता युवराज बोऱ्हाडे आणि चालक सागर सोलनकर यांचा समावेश आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिलं आहे.
व्हिडीओ व्हायरल
व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक महिला सुरक्षारक्षकाला मारहाण करत आहे. ही महिला आपल्या सहकारअयांसोबत मढ येथील एका बंगल्यावर गेली होती. त्यावेळी संभाषणा दरम्यान सुरक्षारक्षकाने राज ठाकरेंना ओळखत नसल्याचं म्हटलं. यानंतर संतापलेल्या या महिलेने त्याला मारहाण केली. ही घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मालवणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनुराग दिक्षित यांनी सांगितले की, दयानंदा या व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. 15 ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल करुन आयपीसी कलम 452, 385, 323, 504, 507 34 अन्वये गुन्हा दाखल केली आहे. यापैकी तीन इसमांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एक महिला रात्र असल्याने पोलीस ठाण्यात आली नाही. त्या महिलेला नोटीस बजावण्यात आली आहे.