जुळे सोलापुरातील या भागातील नागरिकांचा मोठा निर्णय 

0

सोलापूर,दि.५ः सोलापूरमधील प्रभाग क्रमांक २६ मधील गणेश बिल्डर्स स्किम नं ३, अमोल नगर तसेच लोखंडवाला पार्क येथील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश बिल्डर्स स्किम नं ३ ही जुळे सोलापुरातील सर्वात जुनी वसाहत असून येथील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. पाणी पुरवठा, ड्रेनेज, अंतर्गत गटार, रस्ते आदी समस्यांमुळे येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. 

गणेश बिल्डर्स सोसायटी घंटागाडी येण्यासाठी रस्ता नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. या सोसायटीत ९० पेक्षा जास्त कुटुंब राहत आहेत. सोसायटीच्या बाहेर रस्ता अडवण्याचे प्रकार झाल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. महापालिका आयुक्त, आमदार, खासदार यांना निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची माहिती सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. नीता जोशी यांनी दिली. गणेश बिल्डर्स स्कीम  नंबर 3, अमोल नगर, लोखंडवाला पार्क येथील नागरिकांनी याबाबत बैठक घेतली होती. 

गेली ३३ वर्षे झाली अमोल नगर ते रूबी नगर हा रस्ता सरकारी कागदावर असून प्रत्यक्षात त्याचा वापर करू दिला जात नसल्याने नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर महापालिका निवडणूक मतदान १५ जानेवारीला होणार आहे तर मतमोजणी १६ जानेवारीला होणार आहे. सोलापूर महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॅा. सचिन ओम्बासे यावर काय निर्णय घेणार? तसेच उमेदवार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here