पुरे आता यांनी आता घरी बसावं मराठी माणसाला ज्ञान पाजळण्याच्या भानगडीत पडू नये: मनसेची टीका

0

मुंबई,दि.30: मनसेने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलं होतं. ठाणे, मुंबई या शहरातून गुजराती, राजस्थानींना काढून टाकले तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं तेदेखील म्हणता येणार नाही असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केले आहे.

राज्यपालांच्या या विधानावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यपालांच्या विधानावरून विरोधकांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यावर घणाघात केला आहे. यावरून मनसेने देखील जोरदार टीका केली आहे. “नावात भगतसिंग इतकंच यांचं कर्तृत्व, बाकी वरचा कोश रिकामाच दिसतोय” असं म्हणत मनसेने बोचरी टीका केली आहे. 

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत काही ट्विटस केले आहेत. “पुरे आता… यांनी आता घरी बसावं… मराठी माणसाला ज्ञान पाजळण्याच्या भानगडीत पडू नये… नावात भगतसिंग इतकेच यांचं कर्तृत्व बाकी वरचा कोश रिकामाच दिसतोय यांचा…” असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच संतापजनक आणि निषेध हे दोन हॅशटॅग देखील वापरले आहेत. 

“मागे सावित्रीमाई बद्दल आता मराठी, महाराष्ट्राबद्दल बेताल वक्तव्य. हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली आहे. हे खपवून घेतलं जाणार नाही. मराठी, महाराष्ट्राची सभ्यता, संस्कृतीचा अवमान होत असेल तर राज्यपाल या पदाचा मान, मरातब गेला चुलीत. ज्या विषयात कळत नाही तिथे चोमडेपणा करू नका” असं देखील गजानन काळे यांनी म्हटलं आहे.

याबाबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी निशाणा साधला आहे. मिटकरी यांनी ट्विट करत म्हटलंय की, महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसली जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा अशी मागणी त्यांनी केली आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here