वसई,दि.6: अनेकांना फसवणाऱ्या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. अंगात दैवी शक्ती असल्याची बतावणी करत अनेक महिलांना हा भोंदू बाबा गंडा घालत होता. अनेक महिलांचे सोने घेऊन हा पसार व्हायचा. जादूटोणाच्या नावाखाली नागरिकांना गंडवणाऱ्या भोंदू बाबाला वसई पोलिसांनी अटक (Fake baba arrested by Vasai Police) केली आहे. या भोंदू बाबाने आतापर्यंत अनेक महिलांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीने वसई, विरार, नालासोपारा आणि मुंबईतील अनेक ठिकाणी लोकांची फसवणूक केली आहे. अखेर या बोंदूबाबाचा पर्दाफाश झाला असून त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
वसई पूर्व मध्ये राहणाऱ्या काही महिला या भोंदू बाबाच्या जाळयात अडकल्या. माझ्या अंगात काली माता येते, तुमच्या घरी कोण आजारी असेल किंवा तुमच्या काही समस्या असतील त्या मी सर्व दूर करून देणार असे आश्वासन देऊन भोंदू बाबाने महिलांना आपल्या भोंदूगिरीच्या जाळत अडकवले.
नूर -अली- सलमाने (32) असे या भोंदू बाबाचे नाव आहे. या भोंदू बाबाने 18 ते 22 ऑक्टोबर दरम्यान एका महिलेच्या घरी पूजा ठेवली. पूजा दरम्यान तुमच्या जवळ जेवढे सोनं असेल ते पूजा विधीमध्ये आणून एका कपड्यात बांधून ठेवा. जितके जास्त सोनं तुम्ही आणाल तितकेच तुमच्या समस्या दूर होतील असे सांगून हा भोंदू बाबा महिलांना फसवत असे. बांधून ठेवलेल्या सोन्याला 7 दिवस हात नका लावू असे सांगून हातचलाकीने भोंदू बाबाने कपड्यात असलेले सोने बदलून त्यात दगड भरून ठेवले. यानंतर तो पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने वसई माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. माणिकपूर पोलिसांनी सापळा रचून या भोंदूगिरी करणाऱ्या बाबाला अटक केली.